योगेश पवार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे याच परिसरात राहणाऱ्या रोशनी माने नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेम संबंध सुरू असताना योगेशनं आपल्या प्रेयसीला लाखो रुपये हात उसणे दिले होते. याच पैशांवरून मागील काही दिवसांपासून रोशनी आणि योगेश यांच्यात वाद सुरू होता.
advertisement
घटनेच्या दिवशी मंगळवारी १८ मार्चला आरोपी तरुणीने योगेशला फोन केला. मला तुला भेटायचं आहे आणि तुझ्याकडून घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत, अशी बतावणी केली आणि योगेशला नरवणे इथं बोलावून घेतलं. योगेशही नेहमी प्रमाणे प्रेयसीला भेटायला गेला. पण त्याच्यासोबत मोठा घात झाला. योगेश भेटायला गेल्यानंतर आरोपी रोशनीसह तिची आई पार्वती माने आणि इतर पाच जणांनी योगेशवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की योगेशचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला.
योगेशचा खून केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये ठेवला आणि फडतरी येथील कॅनॉलमध्ये फेकला. दरम्यान, मंगळवार पासून आपला भाऊ गायब असल्याने योगेशच्या भावाने दहिवडी पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर फडतरी येथील कॅनॉलमध्ये पोलिसांना एक कार आढळून आली. कारचे दरवाजे लॉक होते. दरवाजे उघडले असता कारच्या मागच्या सीटवर योगेशचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. योगेशची हत्या झाल्याचं निष्पन्न होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपी प्रेयसी रोशनीसह तिची आई पार्वती आणि इतर दोन साथीदारांना मुंबईतून बेड्या ठोकल्या आहे. इतर मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.
