TRENDING:

मेट्रिमोनियल साइट स्कॅम...लग्नाचं आमिष, इमोशनल स्टोरी आणि कोट्यवधींची लूट; 40 महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश

Last Updated:

या ठगाची कामाची पद्धत अत्यंत नियोजीत होती. तो मॅट्रिमोनियल साइट्सवर अशा महिलांना शोधायचा ज्या एकट्या आहेत किंवा ज्यांनी आयुष्यात मोठा आघात सहन केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात जोडीदार शोधण्यासाठी आपण मॅट्रिमोनियल साइट्स किंवा सोशल मीडियाचा आधार घेतो. चॅटिंग दरम्यान किंवा बोलण्यात अनेकदा समोरची व्यक्ती आपलं दुःख समजून घेतेय असं वाटतं आणि आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण याच विश्वासाचा फायदा घेऊन काही लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला बसले आहेत, याची जाणीव आपल्याला नसते. लग्नाचं स्वप्न दाखवून एखाद्याच्या आयुष्यातील कष्टाची कमाई एका क्षणात लुटली जाऊ शकते, हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं. पण सध्या अशाच एका हाय-प्रोफाईल ठगाचा पर्दाफाश झाला आहे, त्याने ज्या पद्धतीने महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं, ते पाहून अनुभवी पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
Ai Generated photo
Ai Generated photo
advertisement

एका पोरक्या मुलाची खोटी गोष्ट आणि शिकार

या ठगाची कामाची पद्धत अत्यंत नियोजीत होती. तो मॅट्रिमोनियल साइट्सवर अशा महिलांना शोधायचा ज्या एकट्या आहेत किंवा ज्यांनी आयुष्यात मोठा आघात सहन केला आहे. विशेषतः विधवा किंवा उच्चशिक्षित प्रोफेशनल महिलांना तो आपलं टार्गेट बनवायचा. एकदा का संपर्क झाला की, तो आपली एक इमोशनल गोष्ट सांगायचा. "मी अनाथ आहे, माझं कोणीच नाही, मला फक्त प्रेमाची आणि हक्काच्या माणसाची साथ हवी आहे," असं म्हणून तो महिलांचा भावनिक आधार जिंकायचा.

advertisement

स्वतःला मोठा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सांगणारा हा तरुण, कोट्यवधींच्या उलाढालीच्या गप्पा मारायचा. मुंबईत 18 कोटींचा बंगला असल्याचा दावा करून तो लग्नाचे लुभावणे प्रस्ताव द्यायचा. जेव्हा समोरच्या महिलेचा पूर्ण विश्वास बसायचा, तेव्हा सुरू व्हायचा त्याचा खरा खेळ.

विश्वास संपादन केल्यानंतर हा ठग पैशांची मागणी करण्यासाठी नवनवीन कथा रचायचा. कधी वडिलांचा मोठा अपघात झालाय आणि तातडीने पैशांची गरज आहे असं सांगून लाखो रुपये उकळायचा, तर कधी माझ्या घरी रोकड सापडल्यामुळे ईडीने धाड टाकली आहे, आता माझे बँक खाते गोठवले गेले आहेत, मला मदत कर अशी भीती घालायचा.

advertisement

इंदूर महापालिकेचे टेंडर पास करून देण्याच्या नावाखालीही त्याने अनेकांना गंडा घातला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकाच वेळी तो अनेक महिलांच्या संपर्कात असायचा आणि प्रत्येकीला आपण फक्त तिच्याशीच लग्न करणार आहोत, असं भासवायचा.

प्रोफेसर महिलेनं लावला छडा

या प्रकरणाचा उलगडा एका धाडसी महिला प्रोफेसरमुळे झाला. पतीच्या निधनानंतर पुनर्विवाहासाठी त्यांनी आपली प्रोफाईल साईटवर टाकली होती. या ठगाने त्यांच्याशी संपर्क साधून 50 लाख रुपये लुटले. जेव्हा त्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांवर अवलंबून न राहता स्वतः या ठगाची माहिती काढायला सुरुवात केली. त्याचा नंबर, पत्ता आणि मेल आयडीचा माग काढत त्यांनी पोलिसांना ठोस पुरावे दिले. जेव्हा या ठगाला पकडण्यात आलं, तेव्हाही तो एका नवीन शिकारला भेटण्यासाठी कॅफेमध्ये बसला होता. तपासात समोर आलं की, आतापर्यंत त्याने तब्बल 40 हून अधिक महिलांना लग्नाचं आमिष दाखवून करोडोंचा चुना लावला आहे.

advertisement

ही धक्कादायक घटना अहमदाबाद येथे उघडकीस आली आहे. अहमदाबाद पोलिसांनी या आंतरराज्यीय भामट्याला इंदूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. अमित नवीन चौबे (रा. शालिनी रोड, देवास, मध्य प्रदेश) असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. अमितने अहमदाबादमधील एका 33 वर्षीय महिला प्रोफेसरची 50 लाख रुपयांची फसवणूक केली होती, ज्यानंतर 11 मार्च 2026 रोजी सोला हायकोर्ट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुजरातसह मुंबई आणि मध्य प्रदेशातील 40 हून अधिक महिलांना त्याने लुटल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

advertisement

मॅट्रिमोनियल साइट्सवर कोणाशीही व्यवहार करताना किंवा वैयक्तिक माहिती शेअर करताना अत्यंत सावध राहा. समोरची व्यक्ती कितीही श्रीमंत किंवा भावनिक वाटली तरी, पूर्ण चौकशी केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका. सतर्कता हाच फसवणुकीपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून घेतली माहिती, नोकरी सोडून उभारला बिस्किट व्यवसाय, महिन्याला 2 लाख रुपयांची उलाढाल
सर्व पहा

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी अशा मॅट्रिमोनियल साईट्स वापरत असेल, तर त्यांच्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा. अशा फसवणुकीच्या घटनांबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.

मराठी बातम्या/क्राइम/
मेट्रिमोनियल साइट स्कॅम...लग्नाचं आमिष, इमोशनल स्टोरी आणि कोट्यवधींची लूट; 40 महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल