नातवाच्या ऐवजी त्यांच्या सुनेने अनुकंपावरील नोकरीसाठी अर्ज केला होता. या विषयावरून आणि ग्रॅज्युईटीच्या रकमेतील काही रक्कम सासूला देण्यासाठी सून नकार देत असल्याच्या रागातून सासूने रागाच्या भरात आपल्या मित्राच्या साहाय्याने दोन दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी परिसरातील जिम्मीबागमध्ये राहत्या घरात सुनेचा खून केला.
खुनाची माहिती महात्मा फुले पोलिस ठाण्याला कळवण्यात आली असून पोलिस लताबाई आणि तिचा मित्र यांच्यावर सध्या कारवाई करत आहे. महात्मा फुले पोलिसांनी लताबाई नाथा गांगुर्डे (60, रा. श्रीनिवास चाळ, न्यू जिम्मीबाग, कर्पेवाडी, कोळसेवाडी, कल्याण पूर्व) आणि लताबाईंचा मित्र जगदीश महादेव म्हात्रे (67, रा. वरपगाव, कल्याण) यांना अटक केली आहे. लताबाई आणि जगदीश यांनी सूनेची हत्या केली असून तिचं नाव रूपाली विलास गांगुर्डे (35) असं आहे. वालधुनी रेल्वे पुलाखाली एक महिलेचा खून करून बेवारस स्थितीत टाकून देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी महात्मा फुले पोलिसांना शुक्रवारी दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा तात्काळ तपास सुरू केला.
advertisement
तपासाच्या वेळी लताबाई महात्मा फुले पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, "रूपाली गुरूवारी रात्री 8 वाजल्यापासून रामबागेतील घरातून गायब आहे. तेव्हापासून ती आजपर्यंत घरी परतलेली नाही." त्यानंतर लताबाईंनी आपल्या सुनेचा फोटो पोलिसांना दाखवला. फोटोतल्या महिलेचा चेहरा आणि मयत महिलेचा चेहरा जुळत होता. या सगळ्या प्रकारणावरून पोलिसांचा लताबाई यांच्याविषयीचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी लताबाईंना ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. चौकशीअंती पोलिसांना लता बाईकडेच खूनाचे धागेदोरे सापडले. लताबाईंनी चौकशीमध्ये सर्व माहिती पोलीसांना दिली.
लताबाईंची पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. लताबाईंचा मुलगा विलास गांगुर्डे भारतीय रेल्वेत नोकरीला होता. त्याचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झाले. मुलाच्या मृत्युनंतर सून रूपालीला 10 लाखांची ग्रॅज्युईटी मिळाली होती. विलासच्या जागेवर त्याचा मुलगा वंश याला आपण नोकरीला लावू असे सासु लताबाईंचे मत होते. पण रूपालीने सासुचे न ऐकता स्वत: साठी अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी रेल्वेकडे अर्ज केला होता. या विषयावरून लताबाई आणि रुपाली यांच्यात वाद सुरू होता. तसेच पतीच्या ग्रॅज्युईटीची रक्कम रूपाली सासूबाईंना देत नव्हती. त्यामुळे लताबाई आणि त्यांच्या मित्राने रूपालीचा काटा काढण्याचे ठरवले.
गुरूवारी रात्री साडे नऊ वाजता लताबाई आणि जगदीश यांनी रूपाली कर्पेवाडीतल्या घरात असताना, तिच्या डोक्यात लोखंडी सळईने प्रहार करून तिला जागीच ठार मारून टाकले. मध्यरात्रीच्या वेळेत तिचा मृतदेह वालधुनी रेल्वे पुलाखाली फेकून दिला. पोलीस निरीक्षक विजय नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लताबाई आणि जगदीश यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय, त्यांना अटक सुद्धा केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलरामसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक, उपनिरीक्षक हिम्मत पवार, दिलीप जाधवसह इतर पथकाने या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली.
