नितीन फकिरा रणशिंगे असं २३ वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे. डीजेच्या दणदणाटामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र अद्याप याची पुष्टी करण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय नितीन आंबेडकर जयंती निमित्त रविवारी रात्री उशिरा नाशिकच्या फुलेगर परिसरात गेला होता. इथं तीन पुतळ्याजवळ डीजे साऊंड सिस्टीम लावून आंबेडकर जयंती साजरी केली जात होती. मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी डिजेवर डान्स करत होत्या.
advertisement
तरुण-तरुणींना नाचताना पाहून नितीन देखील डिजेसमोर जाऊन डान्स करू लागला. बेधुंद होऊन डान्स करत असताना अचानक नितीनच्या नाका तोंडातून रक्त येऊ लागलं. आपल्यासोबत काय घडतंय, हे समजायच्या आधीच नितीनची शुद्ध हरपली. यानंतर आसपासच्या काहीजणांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. ऐन आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येलाच नितीनचा मृत्यू झाला.
आता नितीनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र डिजेच्या आवाजामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस नितीनच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत.