एकट्या शहरात एकापाठोपाठ इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक होत असल्यामुळे सायबर पोलिसांकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या तीनही प्रकरणात नेरूळ आणि तुर्भे या शहरांमध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांना नफ्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशाच प्रकारातून तीन गुन्हे दाखल झाले असून, त्यात 1 कोटी 37 लाखांची नागरिकांची फसवणूक झाली आहे. नेरूळमध्ये राहणार्या प्रशांत पुजारी यांनी ऑनलाइन गुंतवणुकीत रस दाखवला असता, त्यांना व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये घेण्यात आले होते. तिथे पोस्टच्या माध्यमातून भुरळ घालून गुंतवणुकीला भाग पाडले गेले. तब्बल 36 लाख 74 हजार रुपये गमावल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
advertisement
तर, दुसऱ्या प्रकरणात बेलापूरमध्ये राहणाऱ्या दीपक महाले यांनीही ऑनलाइन गुंतवणुकीच्या उद्देशाने 72 लाख 70 हजार रुपये अज्ञाताच्या खात्यावर पाठवले होते. गुंतवणुकीवर कोणताही नफा मिळाला नाही किंवा मूळ रक्कम परत मिळाली नाही. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या प्रकरणात तुर्भे MIDC मधील कंपनीत नोकरीवर असताना आबासो बागल यांची 27 लाख 70 हजारांची फसवणूक झाली होती. एमआयडीसीचा लोगो असलेल्या व्हॉट्स अॅप नंबरवरूनच पाण्याच्या बिलासाठीची माहिती अपडेट करण्याचा मेसेज आला होता. ॲप्लिकेशन फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड झाल्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती गुन्हेगारांकडे. त्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या बँकेतून 27 लाख 70 हजार रुपये काढले. या प्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
