महापे एमआयडीसी येथील शीळफाटा मार्गावर एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. वैद्यकीय अहवालात मृतदेहावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्यामुळे हा खून असल्याचा संशय बळावला. गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी चार विशेष पथके तयार केली. वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, सहायक निरीक्षक नीलेश बनकर, उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे आणि अभय काकड यांच्यासह पथकाने तपास सुरू केला.
advertisement
नॅटग्रीड पोर्टलच्या मदतीने मृताची ओळख संदीप लक्ष्मीकांत विश्वकर्मा (31) अशी पटली. तो मानखुर्द येथे राहणारा होता आणि 15 फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची नोंद ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. तांत्रिक तपासातून 15 तारखेला तो कोपरी, सानपाडा आणि महापे परिसरात फिरल्याचे स्पष्ट झाले. तसेच एका भंगार व्यावसायिकाशी त्याचे संभाषण झाल्याचेही समोर आले.
व्यावसायिकाची चौकशी केली असता दोन कार आणि एका मोटारसायकलवरून आलेल्या काही जणांनी त्याला आणि संदीपला जबर मारहाण केल्याचे सांगितले. तपासातून कार प्रीतम भरत भोईर आणि शिवाजी शंकर डुंबरे यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संकेत राजाराम जगताप आणि अमोल रमेश गुंजाळ यांनाही अटक करण्यात आली.
चौकशीत उघड झाले की संदीप विद्युत डीपीमधील वायर चोरून भंगारात विकत होता. या कारणावरून प्रीतम, शिवाजी आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला मारहाण केली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांचा खबऱ्या असलेला संकेत आणि अमोल यांनी रिक्षातून मृतदेह शीळफाटा परिसरात फेकून दिला.
दरम्यान, अज्ञात मृतदेह सापडल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिस तपासासाठी संकेतची मदत घेत होते. तो काहीच माहिती नसल्याचा आव आणत तपासाची दिशा जाणून घेत होता. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयाच्या धाग्यावरून त्याची भूमिका उघड करत संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश केला.






