येमेनचे राष्ट्रपती रशद अल-अलीमी यांच्याकडून निमिषा प्रिया यांच्या फाशीच्या शिक्षेला मंजुरी देण्यात आली, त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत भूमिका मांडली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार एका महिन्यामध्ये निमिषा प्रिया यांना फाशी दिली जाऊ शकते, त्यामुळे निमिषा प्रिया यांचं कुटंब धक्क्यात आहे. तसंच निमिषा यांना वाचवण्यासाठी वेळ कमी आहे, असं कुटुंबाला वाटत आहे. निमिषा यांची 57 वर्षांची आई प्रेमा कुमारी फाशीची शिक्षा कमी व्हावी, यासाठी जंग जंग पछाडत आहेत.
advertisement
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातल्या कोलेंगोडेच्या रहिवासी असलेल्या निमिषा प्रिया नर्स आहेत. 2008 साली निमिषा आई-वडिलांची मदत करण्यासाठी येमेनला गेल्या. तिकडे त्यांनी रुग्णालयात कामाला सुरूवात केली आणि नंतर स्वत:चं क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला.
2017 साली निमिषा प्रिया आणि त्यांचे येमेनी बिजनेस पार्टनर तलाल अब्दो महदी यांच्यात वाद झाला. यानंतर तलाल अब्दो महदी यांचा मृत्यू झाला, यात निमिषा यांच्यावर महदी यांच्या हत्येचा आरोप झाला, तेव्हापासून निमिषा जेलमध्ये आहेत. 2020 साली सना मधल्या एका ट्रायल कोर्टने निमिषा यांना फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर यमनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने 2023 साली ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवला, ज्याला येमेनच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
ब्लड मनीचा पर्याय
निमिषा प्रिया यांच्या कुटुंबाकडे आता ब्लड मनीचा पर्याय उपलब्ध आहे. ब्लड मनी येमेनची एक पारंपारिक प्रथा आहे, ज्यामुळे निमिषा प्रिया यांची फाशीची शिक्षा कमी केली जाऊ शकते.
