26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या हल्ल्यात 166 लोक मारले गेले होते. या हल्ल्यांमध्ये हॉटेल्स, एक रेल्वे स्टेशन आणि एक ज्यू केंद्र लक्ष्यित करण्यात आले होते. भारताच्या मते, हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने केला होता. पाकिस्तान सरकारने कोणताही सहभाग नाकारला आहे. 64 वर्षीय राणा हा 26/11 हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असून तो पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित असल्याचे मानले जाते.
advertisement
मुंबईवरील हल्ल्यांपूर्वी हेडलीने मुंबईला भेट दिली होती. त्यावेळी हेडलीनं आपण राणाच्या इमिग्रेशन कन्सल्टन्सीचा कर्मचारी असल्याचं भासवलं होतं. डेन्मार्कमधील दहशतवादी कटाला पाठिंबा देणं आणि मुंबईतील हल्ल्याला जबाबदार असलेल्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटने लष्कर-ए-तैयबाला समर्थन देण्याच्या प्रकरणात राणाला अमेरिकेत दोषी ठरवण्यात आलं होतं.
तहुव्वर राणाने अलीकडेच २७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या असोसिएट जस्टिस एलेना कागन यांच्यासमोर हेबियस कॉर्पसच्या प्रलंबित खटल्याबाबत आपत्कालीन अर्ज दाखल केला होता. गेल्या महिन्यात न्यायाधीशांनी अर्ज फेटाळला. त्यानंतर राणाने पुन्हा एकदा भारताकडे होणारं प्रत्यार्पण रोखण्याबाबत अर्ज दाखल केला. हा अर्ज पुन्हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील पत्रकात म्हटलं आहे की, “न्यायालयाने तहव्वुर राणाचा अर्ज फेटाळून लावला आहे.” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, "मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की माझ्या प्रशासनाने २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एका गुन्हेगाराचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे. तो न्यायाला सामोरे जाण्यासाठी भारतात परत जात आहे."
