सागर : मुलीच्या लग्नाची वरात येणार होती. स्वागतासाठी पक्वान्न बनवले जात होते. सर्व तयारी झाली होती. वधू तयारही झाली होती. यातच पोलिसांची एंट्री झाली आणि सर्वांना मोठा धक्का बसला. वधूचे पिता तर बेशुद्ध झाले.
मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील या लग्नात हा सर्व प्रकार घडला. वधू ही अल्पवयीन होती. पोलिसांनी जेव्हा कागदपत्रे तपासली तेव्हा ही बाब समोर आली. पोलिसांनी लग्न थांबवण्याचे सांगितले. त्यामुळे वधूचे आई-वडील अस्वस्थ झाले. तसेच विविध प्रकारच्या धमक्या देऊ लागले. यानंतरही हा मुद्दा सुटला नाही तर मुलीचे वडील बेशुद्ध झाले. त्यात वरपक्षाची लोकही याठिकाणी पोहोचली. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना समजावले. यानंतर नवरदेव नवरीविना घरी परतला.
advertisement
ही घटना सागरच्या सनोदा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. इछावर गावाजवळील हरसिद्धि मंदिरात बालविवाह केला जाणार होता. याबाबत महिला बालसुधारगृहाच्या विशेष पोलीस पथकाला याबाबतची माहिती मिळाली होती. यानंतर महिला व बालविकास विभाग, चाइल्ड लाईन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
पोलिस बालसुधारगृह युनिटच्या प्रभारी ज्योती तिवारी यांनी सांगितले की, लग्नात पोहोचून बालविवाह थांबवण्याचे बोलले असता वधूच्या आईने आम्ही आमदारांशी बोलू, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. तर आम्ही आत्महत्या करू, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. त्यांना 2 तास समजावले. मुलीचे वय 18 वर्षे होण्यासाठी साडेतीन महिने कमी होते.
ज्योती तिवारी यांनी सांगितले की, कायद्यानुसार मुलाचे वय 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण केल्यानंतरच ते लग्नासाठी पात्र ठरतात. कुटुंबांनी त्यांच्या मुलांचे विहित वय पूर्ण केल्यानंतर त्यांचे लग्न करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
