१७ वर्षीय मुलगी नीट परीक्षेची तयारी करत आहे. ती छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहत होती. अभ्यासाच्या तणावातून ३० नोव्हेंबरला तिचा आई-वडिलांशी वाद झाला. या वादानंतर रागाच्या भरात मुलगी हॉस्टेलमधून निघून गेली. त्यावेळी तिच्याकडे अवघे २०० रुपये होते. त्यामुळे ती एसटी, रेल्वे आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करायला सुरुवात केली. ती नाशिक यवतमाळ, परभणी आणि पुणे अशा चार जिल्ह्यात फिरली. पण या चारही जिल्ह्यात वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी समाधान शिंदे (रा. पुणे), निखिल बोर्डे (नाशिक), प्रदीप शिंदे (परभणी) आणि रोहित ढाकरे (पुसद) अशा चार जणांना अटक केली आहे.
advertisement
हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर पीडित विद्यार्थिनी सर्वप्रथम परभणीला गेली होती. याठिकाणी रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप शिंदे भेटला. त्याने राहण्यासाठी जागा देण्याच्या नावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपीनं तिला पुसदला सोडले. पुसदला ओळखीच्या असलेल्या रोहित ढाकरे याने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. यानंतर ती नाशिकला गेली. इथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखील बोर्डे याने जेवण, राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. तीन जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पीडित मुलगी पुण्याला आली. इथे तिची भेट समाधान शिंदे या टॅक्सीचालकासोबत झाली. त्यानेही मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पोलिसांनी पीडित मुलीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला, तेव्हा ती पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तीन पोलीस पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या पोक्सो कलमांसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास वेदांतनगर पोलीस करत आहेत.
