हैदराबाद: एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 26 वर्षीय महिलेला तिच्याच पतीने भाड्याच्या घरात जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी हैदराबादच्या तिलक नगर परिसरात घडली.
मृत महिलेचे नाव चित्याला त्रिवेणी असून ती एका हॉटेलमध्ये काम करत होती. गंभीर भाजल्यामुळे तिला गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पहाटे सुमारे 4 वाजता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी पती के. वेंकटेश (वय 32) याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे.
advertisement
त्रिवेणीच्या वडिलांनी सांगितले की, ते पाच वर्षांपूर्वी आपल्या गावातून हैदराबादला आले होते. गेल्या एका वर्षापासून ते ज्या घरात राहत होते, त्याच घरात त्रिवेणीचा मृत्यू झाला. दोघे आपल्या 8 आणि 6 वर्षांच्या दोन मुलांसह त्या घरात राहत होते.
वेंकटेश अनेक वर्षांपासून त्रिवेणीच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि तिला सतत त्रास देत होता. बुधवारी रात्री सुमारे 12.30 वाजता कामावरून परत येणाऱ्या एका शेजाऱ्याला वेंकटेशच्या घरातून आगीच्या ज्वाळा दिसल्या. त्याने तात्काळ इतर शेजाऱ्यांना याची माहिती दिली.
शेजारी खोलीत गेले असता त्रिवेणी पूर्णपणे आगीत होरपळत असल्याचे दिसले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
त्रिवेणी आणि नरेश यांच्या मुलाने पोलिसांनी सांगितले की, वडिलांनी त्याला पेट्रोलने भरलेली बाटली दाखवली होती आणि घराबाहेर नेले होते. त्यानंतर त्याला समोसा देत, “आज तुझी आई मरणार आहे,” असे सांगितल्याचा धक्कादायक खुलासा मुलाने केला.
यानंतर वेंकटेशने त्रिवेणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. ही घटना घडताच त्यांची मुलगी खोलीबाहेर पळून गेली. आईच्या किंकाळ्या ऐकून जाग आलेल्या मुलीने वडील घराबाहेर पळताना पाहिले आणि तीही बाहेर धावली. सुदैवाने मुलीला कोणतीही इजा झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी शवविच्छेदनानंतर त्रिवेणीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आरोपी वेंकटेशला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
