या दुर्दैवी अपघातात एक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना सातारा जिल्ह्यातील वाई बसस्थानकासमोर घडली आहे. पाचगणीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने वाई बस स्थानकासमोर रस्ता ओलांडणाऱ्या पाच जणांना उडवलं. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर साडेतीन वर्षांच्या मुलासह अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर वाहन चालक पळून चालला होता. पण आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत कार चालकाला थांबवलं आणि त्याला बेदम चोप दिला आहे. यानंतर स्थानिकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या अपघातप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा हा सर्व प्रकार वाई बसस्थानकासमोर असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या अपघातापूर्वी कारचा दरवाजा उघडा असल्याचं देखील व्हिडीओत दिसून आलं आहे. कारचा दरवाजा कशामुळे उघडला? आणि त्यामुळेच हा अपघात झाला का? याचा तपास पोलीस करत आहेत.