काय आहे संपूर्ण घटना -
रोजच्या भांडणाला कंटाळून एका पत्नीने आपल्याच पतीची हत्या करण्यासाठी 3 शूटर्सला 8 लाखांची सुपारी दिली होती. सौदा ठरताच 12 ऑगस्टला सकाळी या शूटर्सने महिलेच्या पतीवर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात महिलेच्या पतीचा मृत्यू झाला नाही. गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर पोलीस 15 दिवस आरोपींचा शोध घेत होते. तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर जी माहिती समोर आली, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
advertisement
ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेश राज्याच्या जालौनच्या तुलसीनगर क्षेत्रातील आहे. संजय राजपूत असे महिलेच्या पतीचे नाव आहे. 12 ऑगस्ट रोजी संजय राजपूत मॉर्निंग वॉकला निघाला असता त्याच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोरांनी त्याला लांबपर्यंत पळायला लावले. मात्र, काही लोकांचा येण्याचा आवाज आल्यावर ते तेथून पळून गेले.
या घटनेनंतर जालौनचे एएसपी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा केले. यानंतर जवळपास पोलिसांनी 15 दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या गोळीबारामागे खरा सूत्रधार दुसरा कोणी नसून संजय राजपूत याची पत्नीच असल्याचे समोर आले.
पोलीस चौकशीत संजय राजपूतची पत्नी अंजली हिने सांगितले की, ती दररोज भांडणाला कंटाळली होती. यासाठी तिने आपल्या मित्रांच्या मदतीने पतीच्या हत्येसाठी 8 लाख रुपयांची सुपारी दिली. यासाठी आरोपींनी 4 लाख रुपये अॅडव्हॉन्स घेतले होते. गोळीबार करणारे आरोपी हे मध्यप्रदेश आणि झाशी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संजय राजपूत सध्या जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी अंजली राजपूतसह 3 जणांना अटक केली असून त्यांना तुरुंगात टाकले आहे.