इराणी डेरामधून 6 वेगवेगळ्या टोळ्यांचे नेटवर्क
भोपाळचा कुख्यात गुन्हेगार आबिद अली उर्फ राजू इराणी उर्फ "रेहमान डकैत" याला सुरत गुन्हे शाखेने अटक केली आहे. १४ राज्यांमध्ये आपले जाळे पसरवणारा हा गुंड भोपाळच्या इराणी डेरामधून ६ वेगवेगळ्या टोळ्यांचे नेटवर्क चालवत असे. सुरतच्या लालगेट भागात पोलिसांनी कोणतीही गोळी न चालवता ही कारवाई केली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात त्याच्यावर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, तो गेल्या २० वर्षांपासून बनावट सीबीआय अधिकारी किंवा साधू बनून लोकांची फसवणूक आणि दरोडे टाकत होता.
advertisement
स्पोर्ट्स बाईक, आलिशान कार आणि अरबी घोडे
राजू इराणी आणि त्याचा भाऊ झाकीर अली यांनी लुटलेल्या पैशातून अतिशय आलिशान जीवनशैली स्वीकारली होती. त्यांच्या ताफ्यात महागड्या स्पोर्ट्स बाईक, आलिशान कार आणि अरबी घोडे होते. स्वतःला परिसरात "डॉन" समजणारा राजू पोलिसांच्या छाप्यावेळी घरातील महिला आणि मुलांचा ढाल म्हणून वापर करून पळून जायचा. डिसेंबर महिन्यात भोपाळ पोलिसांनी १५० कर्मचाऱ्यांसह 'कोम्बिंग ऑपरेशन' केले होते, तरीही तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता.
टोळीचे सदस्य सफारी सूट घालणारे
हा गुन्हेगार आपली टोळी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखी चालवत असे, जिथे पकडल्या गेलेल्या सदस्यांच्या जामिनाची आणि कुटुंबाची जबाबदारी तो स्वतः उचलत असे. टोळीचे सदस्य सफारी सूट घालून अधिकारी असल्याचे भासवायचे आणि वृद्ध लोकांना "सुरक्षा तपासणी" च्या नावाखाली लुटायचे. माहिती देणाऱ्यांना जिवंत जाळण्यापर्यंत या टोळीची मजल गेली होती. २००६ पासून याच्यावर अपहरण, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत दाखल आहेत.
'रील' बनवण्याची प्रचंड आवड
दरम्यान, राजू इराणीला सोशल मीडियावर 'रील' बनवण्याची प्रचंड आवड होती, ज्यामध्ये तो स्वतःला 'रहमान डकैत' म्हणून मिरवत असे. भोपाळ रेल्वे स्थानक परिसरातील सरकारी जमिनीवर कब्जा करून त्याने आपली गुन्हेगारी छावणी उभी केली होती. पुणे, भिवंडी आणि कोलकाता यांसारख्या शहरांपर्यंत त्याचे दहशतीचे साम्राज्य पसरले होते. या अटकेमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
