ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथे राहणारी ज्योत्स्ना शेलार (27 वर्षे) पाच मार्च रोजी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस गस्ती पथकाला मिळाली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला मात्र तिचा तपास लागला नाही.
या प्रकरणी पीटीआयला माहिती देताना गणेशपुरी पोलीस स्टेशनमधील सहाय्यक निरीक्षक धर्मराज सोनके यांनी सांगितलं की, ज्योत्स्नाच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांना तिच्या पतीवर संशय आला. पती दिगंबर शेलार (वय 29 वर्षे) याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
advertisement
सुरुवातीला दिगंबरने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी दिगंबरने पोलिसांना सांगितलं की, त्याने पत्नी ज्योत्स्नाचा खून करून तिचा मृतदेह त्याच्या मूळ गावी (अनगाव) असलेल्या एका पडक्या घरात पुरला.
पुढील तपासात पोलिसांना समजलं की, लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत होतं. काही काळानंतर दिगंबरला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. ज्योत्स्नाचं कुणाशी तरी अफेअर आहे, असा त्याचा समज होता. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. याला कंटाळून ज्योत्स्ना पतीचं घर सोडून अंबरनाथ येथे आई-वडिलांच्या घरी राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, दिगंबर 5 मार्च रोजी तिच्या माहेरी गेला आणि तिला त्याच्यासोबत गावी परत येण्याची विनंती केली. ज्योत्स्ना त्यांचं म्हणणं मान्य करून सासरच्या घरी परतली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरी आल्यानंतर दिगंबरने ज्योत्सनाचा गळा दाबून खून केला. जुन्या घरात खड्डा खणून तिथे तिचा मृतदेह पुरला. घटनेच्या 12 दिवसांनंतर या प्रकरणाचा खुलासा झाल्याने पोलिसांनी ज्योत्स्नाचा मृतदेह बाहेर काढला.
अत्यंत वाईट अवस्थेत असलेला मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी आरोपी पती दिगंबर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
