बिहार राज्यातल्या मुझफ्फरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून एका महिलेने गावातल्या संरपंचाच्या घराबाहेर बसून आंदोलन सुरू केलंय. सरपंचाचा मुलगा असलेल्या तिच्या दीरानं तिला फसवल्याचा आरोप तिनं केलाय. काही दिवसांपूर्वी ती व तिचा दीर घरातून पळून दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी लग्न केलं; मात्र एका महिन्यानंतर तिचा दीर तिला तिथेच सोडून फरार झाला.
अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या जमालाबादमध्ये ही घटना घडली आहे. गेल्या सात दिवसांपासून किरण देवी नावाची महिला सरपंचाच्या घराबाहेर धरणं धरून बसली आहे. सरपंचाचा मुलगा मनीष तिचा दीर आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. महिन्याभरापूर्वी ते दोघं दिल्लीला पळून गेले. तिथे एका मंदिरात त्यांनी लग्न केलं व नंतर महिन्याभरानं तिचा दीर पळून गेला.
advertisement
त्यानंतर तिने त्याला अनेकदा फोन केला; मात्र त्याने तो उचलला नाही, असं किरण देवी यांचं म्हणणं आहे. दिल्लीमध्ये कोणाचीही ओळख नसताना एकट्या पडलेल्या किरण देवी यांना काही लोकांनी मदत केली. रेल्वेचं तिकीट काढून दिलं. त्यामुळे घरी परत येऊ शकल्याचं त्या म्हणाल्या. गावी आल्यावर मात्र नवऱ्यानं त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. दीराच्या वडिलांना म्हणजे सरपंचांना तिने घडलेला प्रकार सांगितला तरी त्यांनीही तिला घरात घेतलं नाही. किरण देवी यांना एक लहान मुलगा आहे. त्यांना दीर मनीषसोबतच राहायचं आहे; मात्र तो सध्या फरार आहे.
जमालाबाद इथे राहणाऱ्या किरण देवी यांचं सहा वर्षांपूर्वी प्रमोद दास यांच्याशी लग्न झालं होतं. मनीष त्यांचा दीर होता. तो त्यांना फोन करत होता. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. त्याच दरम्यान किरण देवी यांना नवऱ्यापासून मुलगाही झाला; मात्र मनीषच्या दिल्लीला पळून जाण्याच्या बोलण्यामुळे आपण फसल्याचा किरण देवी यांचा आरोप आहे. मनीष दिल्लीमध्ये मजुरी करत होता; मात्र तिथे गेल्यावर किरण देवी यांना सोडून तो फरार झाला. किरण देवी यांनी आरोप केले असले तरी अहियापूर पोलिसांनी मात्र तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाबाबत कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. किरण देवी गेल्या सात दिवसांपासून गावातल्या सरपंचांच्या घराबाहेर बसून आहेत.