योगेश पांचाळ असं इराणमध्ये अटक झालेल्या हिंगोलीच्या तरुणाचं नाव आहे. तो पेशानं इंजिनिअर असून त्याचा इम्पोर्ट- एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे. तो ड्राय फ्रुट्स, सफरचंद आणि एअर कूलर सारख्या वस्तू आयात निर्यात करतो. मागील वर्षी 5 डिसेंबरला तो एका कामानिमित्त टुरिस्ट विझावर इराणला गेला होता. इराणला गेल्यानंतर दोनच दिवसात म्हणजेच 7 डिसेंबरपासून तो बेपत्ता झाला. कुटुंबीयांशी त्याचा कसलाही संपर्क होऊ शकला नाही.
advertisement
आता अखेर गुरुवारी 30 जानेवारीला त्याचा कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे. पुढच्या मंगळवारी तुरुंगातून सुटका होईल, त्यानंतर मी भारतात परतेन, असं त्याने आपल्या पत्नीला सांगितलं आहे. दोघांमध्ये जवळपास दीड मिनिटं संभाषण झालं आहे. या फोन कॉलमुळे पांचाळ कुटुंबीयांच्या जीवात जीव आला आहे. मागच्या दोन महिन्यांपासून योगेशचा कुटुंबीयांशी कसलाच संपर्क नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले होते.
योगेशसोबत नेमकं काय घडलं?
खरंतर, इराणमध्ये गेल्यानंतर योगेशने काही संवेदनशील फोटोज क्लीक केले होते. त्याने मनोरंजन म्हणून हे फोटो क्लीक केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर योगेशविरोधात इराणमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याची रवानगी तेहरान तुरुंगात झाली होती. पण त्याने संबंधित फोटो पत्नीव्यतिरिक्त इतर कोणालाही पाठवले नव्हते. याबाबतचे योगेशचे व्हॉट्सअॅप डिटेल्स कोर्टासमोर सादर केल्यानंतर योगेशच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. इराणमधील भारतीय दुतावासाच्या मदतीने योगेशची सुटका होणार आहे. मंगळवारी त्यांची तेहरानच्या तुरुंगातून सुटका होऊ शकते. यानंतर त्याला भारतात पाठवलं जाऊ शकतं.