मिळालेल्या माहितीनुसार, अमित सोनटक्के याचा पीडित मुलीशी पूर्वी परिचय होता. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. यापूर्वी दोघांमध्ये झालेल्या वादानंतर मुलीने आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर आरोपी सतत तिच्या मागे लागला होता. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अमित सोनटक्के तलवार घेऊन मुलीच्या आजीच्या घरी पोहोचला. घरात घुसण्यापूर्वी त्याने आजीला तलवारीच्या धाकावर धमकावले. त्यानंतर घरात शिरून त्याने अल्पवयीन मुलीवर लग्नाचा दबाव टाकला. मात्र मुलीने नकार दिल्यावर आरोपीने तिला जबरदस्तीने पळवून नेले. ही घटना घडताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
advertisement
पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि मुलीची सुरक्षीत सुटका करण्यात आली.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
या संपूर्ण प्रकरणामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरण, धमकी, शस्त्रास्त्र बाळगणे तसेच अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीचा प्रयत्न या गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गणेशपेठ पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अल्पवयीन मुलीचा जीव वाचला. मात्र अशा घटना घडत असल्याने नागपूर शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.