बीड: मनात जिद्द असेल आणि ध्येय पक्कं असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. बीडमधील ऊसतोड मजुराच्या मुलानं हेच दाखवून दिलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातून प्रेरणा मिळाली आणि युवराज ढगे यांनी शाहिरी सुरू केली. आता माजलगाव तालुक्यातील शाहीर युवराज ढगे हे आपल्या प्रभावी गायन शैलीमुळे आख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहेत. त्यांच्या याच प्रवासाबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
भीम गीतांतून महाराष्ट्राचा आवाज
युवराज ढगे यांनी केवळ आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःसाठी ओळख निर्माण केली नाही तर समाज प्रबोधनासाठीही गायनाचा वापर केला आहे. त्यांनी भीम गीतांद्वारे अनेक वेळा दलित, मागासवर्गीय समाजात जनजागृती केली आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये सामाजिक संदेश असतो, अन्यायाविरुद्ध आवाज असतो आणि एक सशक्त विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना ग्रामीण भागात विशेष प्रतिसाद मिळतो.
अनेक स्पर्धा जिंकल्या
युवराज ढगे यांनी अनेक जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या आवाजातील ताकद, शब्दांमधील संवेदनशीलता आणि समाजाशी असलेली बांधिलकी यामुळे ते लवकरच श्रोत्यांच्या मनात घर करतात. त्यांनी शिवजयंती, भीमजयंती यासारख्या थोर विभूतींच्या कार्यक्रमात आपल्या गायनातून ऐतिहासिक घटनांची उजळणी केली आहे.
लोकांना गाणं आवडतं..
“मला लहानपणापासून गाण्यांची आवड होती. त्यामुळे मी अनेकांची गाणी, लोकगीतं, भीमगीतं ऐकत होतो. पुढे संधी मिळेल तिथं गायला सुरुवात केली. लोकांना माझं गाणं आवडत गेलं आणि आज चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रवास संघर्षाचा असला तरी कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. याचा आनंद आहे,” असं युवराज सांगतात.