काय आहे नेमके प्रकरण?
अमाल मलिक हा सध्या 'बिग बॉस १९' च्या घरात आहे. याचदरम्यान, त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोशन गॅरी भिंडर यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. रोशन भिंडर यांनी फरहाना भट्टबद्दल कथितरीत्या सांप्रदायिक तेढ निर्माण करणारी टिप्पणी केली. व्हिडिओ क्लिपमध्ये भिंडर यांनी फरहानाला आतंकवादी म्हटले असल्याचा आरोप आहे. फरहाना भट्ट, जी राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो ॲथलीट देखील आहे, तिच्या कुटुंबाने या अपमानकारक आणि द्वेषपूर्ण विधानाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
advertisement
१ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी
फरहाना भट्टला दहशतवादी म्हणणाऱ्या बदनामीकारक आणि निराधार आरोपांसह खोटी आणि द्वेषपूर्ण विधाने प्रकाशित आणि प्रसारित केल्याबद्दल श्रीमती रोशन गॅरी भिंदर, FIFAFuz युट्यूब चॅनल आणि युट्यूब इंडिया यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
फरहाना भट्टच्या टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक प्रेस नोट जारी करून कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती दिली. या नोटीसमध्ये कुटुंबाने प्रतिष्ठा आणि भावनिक नुकसानीसाठी १ कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. यासोबतच, वादग्रस्त व्हिडिओ त्वरित हटवावा आणि सार्वजनिकरीत्या माफी मागावी, असेही म्हटले आहे.
महिला आयोगाकडेही धाव
फरहाना भट्ट यांच्या कुटुंबाने या वादाला ऑनलाइन बदनामीचा दर्जा न देता, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचा पर्याय निवडला आहे. या कायदेशीर नोटीसची प्रत राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगालाही योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.
फरहानाच्या कुटुंबाने जनतेला आणि प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे की, त्यांनी द्वेष पसरवणारा कंटेंट शेअर करू नये आणि सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा आदर करावा. या संपूर्ण वादावर अमाल मलिक यांच्या कुटुंबाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
