घरात 'पॉवर की' मिळवण्यासाठी एक चुरशीचा टास्क रंगला होता. या टास्कमध्ये जोड्यांना वेगवेगळ्या रंगांच्या चाव्या पकडून ठेवायच्या होत्या. चढाओढ सुरू झाली आणि रुचिता-तन्वी विरुद्ध दीपाली-दिव्या यांच्यात चावीवरून जुंपली. दीपालीने पूर्ण ताकदीनिशी चावी खेचण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच ठिणगी पडली.
रागाच्या भरात रुचिताने ओलांडली सीमा
रुचिताने रागाच्या भरात दीपालीला इशारा दिला की, "एवढं लक्षात ठेव, जर माझी लाथ बसली ना, तर गुडघा धरून पळत सुटशील!" यावर दीपालीनेही प्रत्युत्तर दिलं, पण रुचिताचा राग शांत होण्याचं नाव घेत नव्हता. वाद इतका विकोपाला गेला की रुचिताची जीभ घसरली. दीपालीला उद्देशून ती म्हणाली, "जोपर्यंत मी या घरात आहे, तोपर्यंत हिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन. तुला सळो की पळो करून सोडलं नाही, तर बघ! तुला काय करायचंय ते कर रडके!" एखाद्या स्पर्धकाबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरल्याने घरातील इतर सदस्यही आवाक झाले आहेत. रुचिताने ज्या प्रकारे दीपालीला तुच्छ लेखलं, त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.
advertisement
रुचिताची जान्हवी किल्लेकरसोबत होतेय तुलना
रुचिताच्या या वागण्याने प्रेक्षकांना पाचव्या पर्वातील जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील वादाची आठवण करून दिली. त्यावेळी जान्हवीच्या अशाच वक्तव्यांमुळे रितेश देशमुखने तिची 'भाऊच्या धक्क्या'वर कडक शब्दांत शाळा घेतली होती. याआधीही राकेश बापटसोबतच्या वादात रितेशने रुचिताला समज दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा तिने तीच चूक केल्याने, या विकेंडला रितेश भाऊ रुचिताचा "करेक्ट कार्यक्रम" करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
