सुनील शेट्टी आणि अमिताभ बच्चन यांनी 'काँटे' ॲक्शन चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी सुनील शेट्टीने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना या चित्रपटाच्या शूटिंगचा एक अतिशय खास आणि अनपेक्षित किस्सा सांगितला, ज्यामुळे बिग बींबद्दलचा आदर अनेक पटीने वाढला.
सुनील शेट्टीने सांगितला अमिताभ बच्चन यांचा शॉकिंग किस्सा
हा किस्सा २००२ मध्ये आलेल्या संजय गुप्ता दिग्दर्शित 'काँटे' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेचा आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे गेली होती. चित्रपटात अमिताभ बच्चन, सुनील शेट्टी यांच्यासह संजय दत्त, लकी अली आणि महेश मांजरेकर यांसारखे कलाकारही प्रमुख भूमिकेत होते.
advertisement
यावेळी सुनील शेट्टीने अमिताभ बच्चन यांचा एक किस्सा सांगितला यामुळे सर्वच शॉक झाले. सुनील शेट्टीने सांगितले की, "सेटवर दररोज दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्व कलाकार एकत्र बसून मजामस्ती करत वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचे. पण, अमिताभ बच्चन मात्र नेहमी आमच्यासोबत जेवण्यास टाळायचे. आम्हाला वाटायचे की, त्यांना त्यांच्या व्हॅनमध्ये आराम करायचा असेल, म्हणून ते आमच्यासोबत बसून जेवत नाहीत."
कोणालाही न सांगता लंच ब्रेकमध्ये अमिताभ करायचे ती गोष्ट
मात्र, अमिताभ बच्चन सेटवरील सर्वांसोबत जेवायला का टाळतात, ही गोष्ट सुनील शेट्टी आणि संजय दत्त यांना समजत नव्हती. एकेदिवशी सुनील शेट्टी आणि संजय दत्त यांनी अमिताभ बच्चन यांच्या व्हॅनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण व्हॅनमध्ये प्रवेश करताच त्यांना जे दृश्य दिसले, त्यामुळे त्यांच्या मनात अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा आदर दहा पटीने वाढला.
व्हॅनमध्ये एका डॉक्टरकडून बिग बी फिजिओथेरपी करून घेत होते. सुनील शेट्टीने खुलासा करत सांगितले, "त्यांच्या खांद्यामध्ये खूप वेदना होत्या आणि त्यांची मान आखडली होती. दुपारच्या जेवणानंतर पुढील तासांचे शूटिंग करता यावे, म्हणून ते कोणालाही न सांगता, व्हॅनमध्ये जाऊन उपचार घेत होते." या त्रासातून जात असूनही बिग बींनी आपल्या वेदना कधीही कोणाजवळ व्यक्त केल्या नाहीत. कामाप्रती असलेले त्यांचे हे समर्पण पाहून सुनील शेट्टी आणि संजय दत्त दोघेही भारावून गेले.
