गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने अनेकांना वेड लावलं आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच गौतमीने घायाळ केलं आहे. डान्स शो करणारी गौतमी आता 'प्रेमाची गोष्ट 2'च्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवायला सज्ज आहे. ‘दिसला गं बाई दिसला 2.o’ हे गाणं संगीतप्रेमींच्या पसंतीस येण्याचं कारण म्हणजे, गाण्याचे पूर्वीचे बोल आणि नव्या बीट्सचा सुंदर संगम. पारंपरिक तालात आधुनिक झंकाराची मिसळ, आणि गौतमी पाटीलच्या स्फूर्तीदायक सादरीकरणामुळे हे गाणं तरुणाईचं नवीन फेव्हरेट ठरतंय.
advertisement
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, ‘दिसला गं बाई दिसला 2.o’ हे गाणं तयार करतानाच आमच्या मनात तरुणाई होती. जुनं गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचं होतं, परंतु त्याचा सार कायम ठेवायचा होता. गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे गाण्याला जिवंतपणा आला आणि तिचा परफॉर्मन्सच या गाण्याचं आकर्षण ठरलं.”
'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रेम आणि नशिबाचा जादुई प्रवास असणारा 'प्रेमाची गोष्ट 2' हा चित्रपट 21 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे आता 'प्रेमाची गोष्ट 2'कडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.