माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा आरएनएम मूव्हिंग पिक्चर्सचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'पंचक' पुढील वर्षी 5 जानेवारीला रिलीज होणार आहे. आज त्याचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. आजच्या या ट्रेलर रिलीजवेळी श्रीराम नेने यांनी माध्यमांशी मराठीमध्ये संवाद साधला. त्यांनी आपल्या अमेरिकन शैलीतील मराठीद्वारे या चित्रपटाबाबत माहिती दिली. सध्या नेने यांच्या या मराठी भाषेतील संवादाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
वाढदिवसाच्या 14 दिवसांनी झाला दिशा सालियानचा मृत्यू; 'त्या' रात्री तिच्यासोबत नेमकं घडलं तरी काय?
श्रीराम नेने मराठी असले तरी त्यांचं बालपण अमेरिकेत गेलं आहे. त्यामुळेच अमेरिकन शैलीतील मराठी ऐकून चाहत्यांना फारच आनंद झाला आहे. श्रीराम नेने एक डॉक्टर असून आता पत्नीसोबत मनोरंजन सृष्टीत सक्रिय झाले आहेत. पहिल्याच मराठी चित्रपटातून निर्मितीची सुरुवात होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच चाहत्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची विनंती केली आहे.
'पंचक' या चित्रपटाबाबत सांगायचं तर माधुरी दीक्षित निर्मित या सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर,आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी सागर शोध, संपदा कुलकर्णी ,आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, गणेश मयेकर आणि आरती वडगबाळकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटसृष्टीतील एक सो एक कलाकारांना एकत्रच पडद्यावर पाहण्याची संधी या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवेल असं देखील श्रीराम नेने म्हणाले आहेत.
नुकतंच पंचक सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.'पंचक' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसतं एका कुटुंबात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पुढे त्याच कुटुंबात सर्वांच्या चेहऱ्यावर घबराट दिसते. कुटुंबातील एक व्यक्ती अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवताना दिसतो. तर घरात पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर' या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. आता ट्रेलर पाहून हा विनोदी चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
