"मराठी सिनेमा योग्य हातात आहे!"
पुरस्कार स्वीकारताना महेश मांजरेकर यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ते म्हणाले, "ही बाहुली माझ्यासाठी खूप प्रिय आहे. मला याचा खूप अभिमान आहे. व्ही. शांताराम यांनी मराठी सिनेमा वाढवला आणि त्याला मान दिला. वडाळ्याला बसचे पैसे वाचवायचे म्हणून मी चालत जायचो. प्लाझाच्या समोर एक ट्रँगल आहे. त्या ठिकाणी मी शांताराम बापूंना प्लाझाकडे बघताना पाहिलं होतं. तिथून आजपर्यंतचा माझा प्रवास पाहता, मी नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असेल."
advertisement
आपल्या भाषणात त्यांनी मराठी सिनेसृष्टीच्या भविष्याबद्दलही आशा व्यक्त केली. ते म्हणाले, "एका गोष्टीचा आनंद आहे, तो म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी आता योग्य हातात आहे. मराठी सिनेमा पुन्हा एकदा दैदिप्यमान पदावर असेल, याची मी खात्री देतो."
"आता स्पर्धेत उतरणं गरजेचं आहे!"
मांजरेकरांनी मराठी सिनेमांच्या सध्याच्या स्थितीवरही आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "मी हल्ली काही चित्रपट पाहिले, त्यामुळे आता स्पर्धेत उतरणं गरजेचं आहे. कंटेंटच्या बाबतीत आपण पुढे आहोतच, पण आता व्यवहाराच्या बाबतीतही पुढे जाणं आवश्यक आहे."
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांसारखे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे महेश मांजरेकर यांच्या योगदानाला एक मोठी दाद मिळाली आहे.