"वादळ तुझं तू राजा..." तेजस्विनीची खास पोस्ट
या वेळची मुंबई महानगरपालिका निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे, कारण तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांच्या युतीमुळे संपूर्ण मुंबईत एक वेगळीच लाट पाहायला मिळतेय. याच वातावरणाला दाद देत तेजस्विनीने राज ठाकरेंचा एक भारदस्त फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
advertisement
तिने या पोस्टला दिलेलं कॅप्शन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. तिने लिहिलंय, "मोठी लढाई लढू... मातीसाठी रं गड्या, मनगटाचं जोर लावून.... तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी....." या ओळींमधून तिने राज ठाकरेंच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि मराठी मातीसाठीच्या लढाईत त्यांना दिलेला पाठिंबा उघडपणे व्यक्त केला आहे. तेजस्विनी नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपलं मत मांडत असते, पण ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी तिने उघडपणे राज ठाकरे यांना साथ दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
"भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका!"
केवळ कोणा एका नेत्याचा प्रचार न करता तेजस्विनीने कालच मतदारांना एक मोलाचा सल्लाही दिला होता. तिने नागरिकांना आवाहन केलं होतं की, आपला नगरसेवक निवडताना सतर्क राहा. तिने म्हटलं होतं की, आपल्या रोजच्या नागरी सुविधांसाठी नगरसेवक महत्त्वाचा असतो, त्यामुळे योग्य आणि सुशिक्षित उमेदवारालाच मत द्या. पण आज थेट राज ठाकरेंचा फोटो शेअर करून तिने आपली दिशा स्पष्ट केल्याचं दिसतंय.
मुंबईत चुरशीची लढत, कोण मारणार बाजी?
यंदाची लढाई चौरंगी नसून दोन मोठ्या गटांमध्ये विभागली गेली आहे. एका बाजूला भाजप आणि शिंदे सेना यांची महायुती आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी अभेद्य भिंत उभी राहिली आहे. १५ जानेवारीला मतदान पार पडणार असून अवघ्या २४ तासांनंतर, म्हणजेच १६ जानेवारीला मुंबईचा गड कोण सर करणार, हे स्पष्ट होईल.
