'लाडकी विहीण योजना' या नावाचं नवं मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री निर्मिती सावंत प्रमुख भूमिकेत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनी त्यांचा दमदार विनोदी अवतार रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. ‘कुमारी गंगूबाई मॅट्रिक’ या नाटकाने रंगभूमीवर तुफान लोकप्रियता मिळवली होती. त्या नाटकातील ‘गंगूबाई’मुळे निर्मिती सावंत घराघरात पोहोचल्या. त्यानंतर याच नावाने मालिका देखील खूप गाजली. त्याच नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे आणि निर्माते दिलीप जाधव यांच्यासोबत निर्मिती सावंत पुन्हा एकत्र येत आहेत.
advertisement
( पडद्यामागचा आवाज आता पडद्यासमोर! अनेक वर्षांनी TV वर परत येतीये ती अभिनेत्री )
‘लाडकी विहीण योजना’ या नाटकाचं लेखन प्रथमेश शिवलकरनं केलं आहे. तर दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे. या नाटकाची निर्मिती अष्टविनायक नाट्यसंस्था आणि पंचशील एंटरटेन्मेंट तर्फे केली जात आहे. निर्मितीमध्ये अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्यासह मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि स्वप्नील जोशी यांची आहे. प्रसाद ओक निर्माता म्हणून रंगभूमीवर पदार्पण करतोय.
हे नाटक विहिणींमधील नातेसंबंधांवर आधारित आहे. कोकण परिसराच्या पार्श्वभूमीवर फुलणारी कथा नाटकात पाहायला मिलणार आहे. कौटुंबिक नात्यांमधील गमती-जमती आणि हलकाफुलका विनोद नाटकात पाहायला मिळणार आहे.
नाटकाबद्दल बोलताना निर्मिती सावंत म्हणाल्या की, त्यांचं नाटकावरचं प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र चित्रपटांच्या बांधिलकीमुळे सध्या रंगभूमीवर काम करता येत नव्हतं. त्यामुळे नाट्यनिर्मितीची इच्छा मनात होती. दिलीप जाधव यांनी ती इच्छा लक्षात ठेवून हे नाटक त्यांच्यापर्यंत आणलं. प्रमुख भूमिकेत स्वतः आणि मित्र प्रथमेश शिवलकर यांचं लेखन असल्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. आता 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी विहीण योजना' रंगभूमीवर किती गाजते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
