नुकताच बिहार निवडणुकांचा निकाल लागला आहे. जिथे भाजपचा विजय झाला. आता सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकांकडे लागून आहे. अशातच अनेक कलाकार राजकीय मतं मांडताना दिसत आहेत. काही दिवसांआधी ज्येष्ठ मराठी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी 'मी भाजपचा, मी मोदीभक्त' आहे असं म्हणत भाजपला पाठिंबा दिला. त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही भाजपला पाठिंबा दिला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'मी कट्टर भाजप समर्थक' असल्याचं सांगितलं. निवेदिता सराफ यांचं हे वक्तव्य सध्या राजकीय आणि मनोरंजन विश्वात चर्चेत आलं आहे.
advertisement
अभिनेत्री निवेदिता सराफ या नुकत्याच ठाण्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांना भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
( 'सूनबाई अडकल्या म्हणून आता मोदीभक्तीने पछाडलं', महेश कोठारेंच्या वक्तव्यावर ठाकरे सेनेचा हल्लाबोल)
काय म्हणाल्या निवेदिता सराफ?
अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी संजय केळकर यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, "मंचावर उपस्थित सगळेच, आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा फार कट्टर बीपेजी असल्यामुळे मला फारच आनंद झाला आहे." निवेदिता सराफ यांनी भाजपचं जाहिररित्या समर्थन आणि कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.
निवेदिता सराफ यांना त्यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्या म्हणाल्या, "आज जी मी काही आहे ते माझे गुरु ,पती यांच्यामुळे आहे. आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला, याचा विशेष आनंद आहे." त्याचप्रमाणे निवेदिता सराफ यांनी त्यांच्या गुरूंची आठवण काढत, त्यांचा बालनाट्यापासून आतापर्यंतचा प्रवास उलगडला. या प्रसंगी त्या अत्यंत आनंदी असल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले होते महेश कोठारे?
अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिवाळी निमित्ताने बोरिवली येथे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना महेश कोठारे म्हणाले होते, "हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे. भाजप म्हणजे आपलं घर आहे. कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमापर्यंत मुंबईवर कमळ फुललेलं असेल याची मला गॅरंटी आहे. आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा आहे. पण यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल".
