अभिनेता प्रसाद ओक सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टचं शुटींग करत आहे. धर्मवीर सिनेमानंतर प्रसादची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढली आहे. त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याला भेटण्यासाठी अनेक चाहते सेटवर जात असतात. असेच काही चाहते त्याला भेटण्यासाठी त्याच्या सेटवर गेले मात्र त्यांची भेट ही प्रसादसाठी अविस्मरणीय ठरली. त्यांच्या निर्लेप, निखळ आणि निरपेक्ष प्रेमाची उतराई कशी करू असाच प्रश्न प्रसादला पडला.
advertisement
प्रसादनं घडलेला प्रसंग सर्वांबरोबर शेअर केला आहे. प्रसादनं पोस्टमध्ये लिहिलंय, "आज अचानक पॅकअप नंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप वॅनिटी वॅनमध्ये आला आणि म्हणाला, दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आले त्यांना ५ मिनिटं देशील का? मी म्हटलं बोलाव. त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे 2-3 मित्र अशी काही मंडळी आली".
प्रसाद पुढे म्हणाला, "काही कळायच्या आत एकानी मला फेटा बांधला. दुसऱ्यानी गळ्यात हार घातला आणि तिसऱ्यानी म्हणजे नवनाथने ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली. आणि सगळे जाऊ लागले. मी म्हणालो, "एवढ्याच साठी आला होतात?" त्यावर ते म्हणाले "हो दादा, वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी बास". आणि सगळे क्षणार्धात मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले".
"मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं??? या जिव्हाळ्याचं, या आपुलकीचं काय करायचं? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक 'अवघड वाट' आहे", असंही प्रसादनं म्हटलं आहे. त्याला भेट दिलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहून त्यानं धर्मवीर सिनेमातील भेटला विठ्ठल या गाण्याच्या काही ओळी देखील शेअर केल्यात.