नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव या आदिवासी बहुल परिसरातील भरड्याची वाडी या गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील 45 वर्षीय बच्चुबाई विष्णू हंडोगे या महिलेने तब्बल 14 मुलांना जन्म दिला. यापैकी 6 हून अधिक मुला-मुलींची तिने पैशासाठी विक्री केल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
( Rinku Rajguru : 'आर्ची'वर वरचढ ठरणार रिंकूची 'आशा'? 2 मिनिटं 18 सेकंदाचा VIDEO, शेवट चुकवू नका)
10 ऑक्टोबर 2025 रोजी या महिलेला 14वं बाळ झालं होतं. मात्र बाळाचं वजन अत्यंत कमी असल्याचं निदर्शनास आलं. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली. नवजात बाळाच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने स्थानिक आशा सेविकांना महिलेकडे पाठवलं. जेव्हा आशा सेविका तिच्या घरी पोहोचल्या तेव्हा धक्कादायक प्रकार उघड झाला. ते बाळ घरात नाही, ते कोणाला तरी देऊन टाकल्याचं सांगण्यात आलं.
या संपूर्ण घटनेत नाशिकमधील आशा सेविकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे पोटच्या मुलांची विक्री करणाऱ्या आईचं बिंग फुटलं. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपासासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तसंच पुढील तपासासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय झाली आहे.
नाशिकचा हा संपूर्ण प्रकार ज्यांच्यामुळे समोर आला त्या आशा सेविका अनुसया डोळस यांच्यामुळे. त्या महिलेच्या घरी गेल्यानंतर नेमकं काय घडलं हे त्यांना सांगितलं. त्या म्हणाल्या, "मी वजन काटा घेऊन त्यांच्या घरी गेले होते. त्यांना म्हटलं वजन करण्यासाठी तुमचं बाळ आणा. त्यावर ते म्हणाले, बाळ नाहीये, देऊन टाकलं. कोणाला दिलं विचारल्यावर ते म्हणाले, दिलं असंच एक जणाला. त्यांनी नाव सांगितलं नाही. बाळ देऊन 8-10 दिवस झालेत."
"ते बाळ दीड महिन्याचं होतं. माझ्याजवळ त्यांची 2-3 बाळं होती. मी जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा त्यांच्या घरात मला 2-4 छोटी मुलं दिसायची. त्यांच्याघरात एकूण किती मुलं आहेत हे मला माहिती नाही. त्यांच्या काही मुलींची लग्न झाली. मला हा प्रकार कळल्यानंतर मी माझ्या वरिष्ठांना फोन केला. त्या आईनेच सांगितलं की मी बाळ दुसऱ्याला दिलं. मी नेहमी त्यांच्याकडे जायचे. त्या आनंदानं बाळ आणून द्यायच्या. पण त्या दिवशी ती बाई रिकामी बसली होती. मी माझ्यासाठी त्यांचा फोटोही काढून घेतला", असंही अनुसया डोळस यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये घडलेली ही घटना समाजात खळबळ उडवणारी आहे. 'आशा' या सिनेमातून आशा सेविकांच्या संघर्षमय आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. स्क्रीनवर रिंकू राजगुरूने साकारलेली आशा सेविकेची भूमिका एकीकडे प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात नाशिकमधील आशा सेविकांनी दाखवलेलं धैर्य आणि कर्तव्यदक्षता ही खरी सामाजिक जाणीव जागवणारी ठरत आहे.
