संभाजी ससाणेची निवड होण्यामागचा किस्सा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखाच आहे. संभाजी सांगतो, "मला निर्माते संजय झणकर यांचा फोन आला तेव्हा खूप आनंद झाला होता. दिग्दर्शक शेखर रणखांबे आणि संजयजींना भेटायला गेलो तेव्हा मला वाटलं आता ऑडिशन होईल, चर्चा होईल; पण त्यांनी माझ्या तोंडावर सांगितलं की, 'आम्ही जो चेहरा शोधतोय, तू तसा दिसत नाहीस.' ते ऐकल्यावर मी सुन्न झालो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दोन-तीन आठवड्यांनंतर पुन्हा फोन आला आणि मला सांगितलं गेलं की तूच आमचा हिरो आहेस!"
advertisement
शीतलचं फ्लॉप ऑडिशन अन् नशिबाची पलटी
हिरोईन शीतल पाटीलचा अनुभव तर त्याहूनही वेगळा होता. तिला वाटलं होतं की एखादी छोटी भूमिका मिळेल. शीतल म्हणते, "जेव्हा मी ऑडिशन दिलं, तेव्हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला खात्री पटली होती की इथे आपलं काहीही होणार नाही. मी तर त्या नादातून बाहेरही पडले होते. पण काही दिवसांनी अचानक लीड रोलसाठी माझा विचार झाल्याचं कळलं आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही."
बॉक्स ऑफिसवर Border 2 चा राडा, याच गदारोळात 'बॉर्डर ३' ची अधिकृत घोषणा, कधी रिलीज होणार फिल्म?
नकार देऊनही त्यांनाच का निवडलं?
दिग्दर्शक शेखर रणखांबे आणि निर्माते संजय झणकर यांनी यामागचं गुपित उलगडलंय. शीतलचं ऑडिशन तेव्हा त्यांना आवडलं नव्हतं, पण त्यांना जो चेहरा आणि जे डोळे हवे होते, ते शीतलकडे होते. वर्कशॉपमध्ये तिने स्वतःला सिद्ध केलं. संभाजीच्या बाबतीतही तेच घडलं. जो रांगडापणा आणि मातीतील रुबाबदार पात्रासाठी हवा होता, तो शेवटी या दोघांच्याच व्यक्तिमत्त्वातून झळकला.
६ फेब्रुवारीला रिलीज होणार 'रुबाब'
झी स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रपट प्रेमाची, स्वाभिमानाची आणि अस्सल मराठमोळ्या स्वॅगची गोष्ट सांगणार आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नव्या दमाचे कलाकार जेव्हा नकाराचं पचवून मोठ्या पडद्यावर झळकतात, तेव्हा तो 'रुबाब' काही वेगळाच असतो, हे आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
