सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार
सतीश शाह यांचे पडद्यावरील चिरंजीव म्हणजेच अभिनेता सुमित राघवन याने 'इंडिया टुडे'शी बोलताना एक महत्त्वाचा खुलासा केला. सुमित म्हणाला, "काल रात्री मला माझ्या एका आयपीएस (IPS) मित्राचा फोन आला. गृह मंत्रालयाला सतीश शाह यांच्या जवळच्या खास सहाय्यकाचा नंबर हवा होता, जेणेकरून या सन्मानाची अधिकृत माहिती त्यांच्या घरापर्यंत पोहोचवता येईल." सुमितने तातडीने सतीशजींच्या सेक्रेटरीला फोन करून या वृत्ताची खातरजमा केली.
advertisement
सुमीत राघवनने व्यक्त केल्या भावना
सतीश शाह यांना 'पद्मश्री' मिळाल्याचा अभिमान वाटत असला, तरी सुमित राघवनच्या मनात एक सल कायम आहे. "हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहेच, पण मन कुठेतरी विचारतय की, कलाकार आपल्यात असतानाच हे सन्मान का दिले जात नाहीत? सतीश काकांनी स्वतः हा पुरस्कार स्वीकारला असता, तर त्या आनंदाची सर कशालाच आली नसती," अशा शब्दांत सुमितने आपल्या भावना व्यक्त केल्या. २५ ऑक्टोबर रोजी सतीश शाह यांच्या निधनाने जो मोठा आघात कुटुंबावर झाला होता, त्यावर हा पुरस्कार फुंकर घालण्याचं काम करेल, असंही त्याने नमूद केलं.
सतीश शाह यांच्या या सन्मानाने त्यांची सहकलाकार रत्ना पाठक शाह (माया साराभाई) आणि रुपाली गांगुली (मोनिशा साराभाई) यांनीही आनंद व्यक्त केला आहे. ७४ वर्षीय सतीश शाह यांचे गेल्या वर्षी २५ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. २०२३ मधील 'युनायटेड कच्छे' ही त्यांची शेवटची वेब सिरीज ठरली. मात्र, आजही 'इंद्रवदन साराभाई' म्हणून ते प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर
एकीकडे सतीश शाह यांची चर्चा असतानाच, बॉलीवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाल्याने चित्रपटसृष्टीतील एका सुवर्ण युगाचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
