प्रवीणा देशपांडे यांचा अभिनयाचा पाया रंगभूमीवर रचला गेला. नाटकांच्या तालमीत तयार झालेल्या प्रवीणाजींनी अभिनयाचे सर्व बारकावे आत्मसात केले होते. त्यामुळेच जेव्हा त्या कॅमेऱ्यासमोर आल्या, तेव्हा त्यांच्या प्रत्येक भूमिकेत एक जिवंतपणा जाणवायचा. मराठी मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या कणखर आई आणि कौटुंबिक चौकटीतील महत्त्वाच्या स्त्रियांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
सलमान खान-अक्षय कुमारसोबत शेअर केली स्क्रीन
advertisement
केवळ मराठीच नाही, तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सलमान खानच्या गाजलेल्या 'रेडी' चित्रपटातील त्यांची सहाय्यक भूमिका असो वा 'गब्बर इज बॅक' मधील काम, त्यांनी नेहमीच आपल्या उपस्थितीने पात्राला न्याय दिला.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नीरज पांडे यांच्या 'तस्करी' या वेब सीरिजमध्ये प्रवीणा देशपांडे एका छोट्या भूमिकेत दिसल्या होत्या. या कामाचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या कामाची त्या प्रचंड चाहती होत्या आणि "पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करायला आवडेल," अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. ही इच्छा उराशी बाळगूनच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठीसह अनेक हिंदी सिनेमे-वेबसीरिज गाजवल्या
प्रवीणाजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. यात प्रामुख्याने जलेबी, एक व्हिलन, गब्बर इज बॅक, ब्लॅकमेल, हॅक्ड, द फॅमिली मॅन, तस्करी यांसारखे चित्रपट आणि वेबसीरिजचा समावेश आहे.
त्यांच्या कुटुंबाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ही दुःखद बातमी शेअर केली. आज दुपारी ३ वाजता मुंबईतील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
