शरद पोंक्षे यांचा मुलगा मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात आता लवकरच ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यांच्या या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांचा मुलगा म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे. या सिनेमाच्या संपूर्ण टीमनं प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन शुभारंभ केला. सध्यातरी या सिनेमाचं नाव ठरलेलं नसलं तरी या सिनेमाच्या निमित्तानं वडिल-मुलाची जोडी मात्र एकत्र काम करणार आहे.
advertisement
( हेही वाचा - 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता झाला बाबा; घरात झालं गोंडस परीचं आगमन )
वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं 1’ या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या सिनेमाच्या निर्मात्या आहेत तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. सिनेमा लेखनही स्नेह पोंक्षे याने केलं आहे. बाप लेकाची ही जोडी नक्की कोणत्या विषयावर सिनेमा घेऊन आपल्या समोर येणार आहेत, हे फार औत्सुक्याचे ठरणार आहे.
पहिल्या सिनेमाच्या निर्मितीबद्दल बोलताना अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, ‘’एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या सिनेमाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल.’’
तसंच दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेला स्नेह पोंक्षे म्हणाला, " लवकरच हा सिनेमा आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आम्ही सुद्धा या सिनेमासाठी खूप उत्सुक आहोत. चित्रीकरणाला सुरूवात होणार असून विषय, शीर्षक, कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करू. पदार्पणातच वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा विशेष आनंद आहे.’’
