नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा प्रश्न गेली अनेक सुरू आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातील अनेक नाट्यगृहांची कामे करण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील अनेक नाट्यगृह आजही त्यात अवस्थेत आहेत. बीडमध्ये पुरूष नाटकाचा प्रयोग रंगला मात्र नाट्यगृहाची दुरावस्था पाहून कलाकारांनी नाराजी व्यक्त केली.
( डायलॉग विसरले, प्रयोग रद्द, डोळ्यात पाणी अन् खंबीर बापाला मुलानं सारवलं; शरद पोंक्षेंचा VIDEO )
advertisement
'पुरुष' हे लोकप्रिय मराठी नाटक सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपले प्रयोग सादर करत आहे. 16 फेब्रुवारी रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील प्रयोगादरम्यान कलाकारांना अतिशय वाईट अनुभव आला. नाट्यगृहातील अस्वच्छता, प्रसाधनगृहांची भयावह अवस्था पाहून कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित असलेल्या बीड नाट्यपरिषदेच्या पदाधिकारी आणि उपायुक्तांसमोरच कलाकारांनी निषेध नोंदवला. या घटनेचा व्हिडिओ अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जर नाट्यगृहाची अवस्था सुधारली नाही तर पुन्हा कधीही ते आपले नाटक घेऊन बीडमध्ये येणार नाहीत, असा इशारा शरद पोंक्षे यांनी दिला आहे.
व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणतात, "बीडमधील रसिकांनी नेहमीच आमच्यावर प्रेम केले आहे. इतक्या दुरून आम्ही केवळ तुमच्यासाठी येतो. पण, या नाट्यगृहाची अवस्था पाहता पुन्हा इथे येणे शक्य नाही. एसी थिएटरचे 21 हजार रुपये भाडे आकारले जाते, पण येथे एअर कंडिशनरच नाही. मुंबईतही इतके भाडे नसते. प्रसाधनगृहे, स्वच्छता या बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. बाथरूमची अवस्था इतकी बिकट आहे की महिला कलाकारांना तिथे जाणेही कठीण झाले आहे."
ते पुढे म्हणाले, "ज्यांच्याकडे या नाट्यगृहाची जबाबदारी आहे त्यांनी लक्षात ठेवावे की अशीच परिस्थिती राहिल्यास दर्जेदार नाटक आणि कलाकार बीडला येणे बंद होतील. याचा फटका रसिकांनाच बसेल. मी स्वतः या नाट्यगृहात पुन्हा येऊ इच्छित नाही. आमची इच्छा मेली आहे. बीडमध्ये इतरत्र कार्यक्रम असेल तर नक्की येईन, पण या नाट्यगृहात नाटक करण्याची माझी इच्छा नाही."
