चित्रपटाचे पोस्टर पाहताच, दोन वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगलाचे हृदयस्पर्शी चित्रण डोळ्यासमोर उभे राहते. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हे दोघेही पोस्टरवर फोनवरून बोलत असल्याचे दिसत आहेत. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावातून त्यांच्या या संवादांमागे काहीतरी गडद भावना दडलेल्या असल्याचे जाणवते.
लाँग डिस्टन्स रोमान्सला देणार नवा अर्थ
लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे कधी मनं जुळवणारे, तर कधी मन पोखरणारे? वेळेतील आणि ठिकाणांमधील अंतर नात्याला दुरावते की अधिक स्थिर करते? हे प्रश्न पोस्टर पाहताच मनात घर करून जातात.
advertisement
दिग्दर्शक समीर हेमंत जोशी यांनी 'मिस यू मिस्टर' या चित्रपटामागची मूळ कल्पना स्पष्ट केली आहे. समीर हेमंत जोशी सांगतात, "हा चित्रपट केवळ दोन वेगवेगळ्या शहरांची गोष्ट नाही, तर ती दोन मनांची गोष्ट आहे. वेळेत आणि राहण्याच्या ठिकाणी अंतर पडले, तर नातं दुरावतं की अधिक स्थिर होतं? 'मिस यू मिस्टर' याच चढउतारांची गोष्ट आहे."
कलाकारांची दमदार फळी
चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असून, त्यांची केमिस्ट्री या कथेला अधिक जिवंत करेल. या चित्रपटात त्यांच्यासोबत राजन भिसे, सविता प्रभुणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर, दीप्ती लेले यांसारख्या अनुभवी कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दीपा ट्रेसी आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या प्रयत्नातून ही रोमान्स आणि भावनिक वास्तव दर्शवणारी कथा लवकरच मोठ्या पडद्यावर येत आहे.
