मुंबई : अनेक मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. अभिनेता सुबोध भावेच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. सुबोधच्या घरचा गणपती आणि आरास नेहमीच खास असते. बाप्पाच्या देखाव्यातून दरवर्षी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही सुबोधच्या घरीत बाप्पासाठी खास देखावा करण्यात आला आहे. न्यूज 18 लोकमतशी बातचीत करताना सुबोधनं त्याच्या देखाव्याबद्दल सांगितलं.
advertisement
सुबोध म्हणाला, "कार्तिक स्वामी आणि बाप्पाामध्ये स्पर्धा होते. पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासाठी कार्तिक स्वामी जातात. पण गणपती बाप्पा मात्र आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा मारतात. माझ्यासाठी माझं विश्व, माझं जगच माझे आई-वडील आहेत. गोष्ट छोटी असली तरी संदेश खूप मोठा आहे. आजकाल आपण अनेकदा पाहतो, वाचतो की वृद्ध आई-वडिलांना बाहेर काढतात, त्यांना एकट्याला सोडलं. अशा काळात एक देवाची गोष्ट आहे. जी पृथ्वीचं स्वरूप स्वत:च्या आई-वडिलांमध्ये पाहते. आपल्या आई-वडिलांचा आपण सांभाळ करावा, त्यांचा आदर करावा, त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांचा सन्मान करावा, या छोट्याशा गोष्टीमधून खूप मोठी शिकवण आपल्याला मिळतो."
सुबोध पुढे म्हणाला, "मानस मल्हार कान्हा या सगळ्यांनी मिळून देखावा तयार केला आहे. मुलांचा सहभाग त्यात जास्त असायला हवा. आपण लहान असताना हे केलेलं आहे. आताच्या मुलांना यात गोडी वाटली, रस वाटला तर त्या उत्सवाला अर्थ आहे असं मला वाटतं. गणपतीनिमित्तानं कुटुंब, समाज एकत्र येतात. एकमेकांसोबत सणांचा आनंद लुटतात. हा सण जितके दिवस असतो त्यात तो आपल्याला विलक्षण चैतन्य देऊन जातो. दीड दिवसांचा गणपती."
"बाप्पाकडे काही मागण्याची गरज नाही. आपल्यापेक्षा तो फार बुद्धीमान आहे. न मागता त्याने खूप काही दिलंय. तो बुद्धीची देवता असल्याने त्याने दिलेली बुद्धी टिकून ठेवण्याची बुद्धी त्याने आम्हाला द्यावी, एवढीच विनंती करेल", असंही सुबोध म्हणाला.