ही पहिलीच वेळ नाही की चाहत्यांच्या गर्दीमुळे अशा प्रकारचा अपघात झाला आहे. 2024 मध्ये अल्लू अर्जुनच्या "पुष्पा 2" चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यानही अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती.
विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा 39 वर, दुर्घटना कशी घडली? कारण आलं समोर
पुष्पा 2 प्रीमियरची घटना
4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी अल्लू अर्जुन स्वतः उपस्थित होता. पण थिएटरबाहेर चाहत्यांनी केलेल्या प्रचंड गर्दीत पोलिसांचं नियंत्रण सुटलं. चाहत्यांच्या धावपळीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचं मूल गंभीर जखमी झालं. मुलाला तातडीने केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
advertisement
या घटनेनंतर अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. चिक्कडपल्ली पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्याला नामपल्ली न्यायालयात हजर करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, अभिनेत्याच्या वकिलांनी लगेच उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याच दिवशी अंतरिम जामीन मंजूर झाला.
अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटल्यानंतर माध्यमांसमोर आला. त्याने ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं आणि मृत महिलेच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली. त्याचबरोबर मदतीचा हातही पुढे केला. माध्यमांशी बोलताना अल्लू अर्जुन म्हणालेला, "कुटुंब चित्रपट पाहण्यासाठी आलं आणि त्यांच्यासोबत अशी दुर्घटना घडली याचं मला खूप दुःख होतं. मी याबद्दल माफी मागतो. हे माझ्या नियंत्रणाबाहेर होतं. पण तरीही मी त्या कुटुंबाला शक्य तितका पाठिंबा देईन."
दरम्यान, विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीनंतर चाहत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. स्टार्सची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची धडपड समजण्यासारखी असली तरी यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी पोलिस प्रशासन आणि आयोजकांनी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होतेय.