'तुला जपणार आहे' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद फाटक यांनी तारांगणशी बोलताना ठाण्यातील रस्ते आणि ट्रॅफिक विषयी वक्तव्य केलं. ते म्हणाले, "गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून माझी 'तुला जपणार आहे' ही मालिका झी मराठीवर सुरू आहे. याचं शूटींग ठाण्यात ओवळा नाका, घोडबंदर रोड येथे एका स्टुडिओमध्ये चालतं. मी राहतो अंधेरी लोखंडवाला एरियात. फेब्रुवारी महिन्यात आम्ही सुरूवात केली होती तेव्हा या प्रवासाला 1 तास लागायचा. जातानाही 10.30 ला पॅकअप झालं की आम्ही एक तासात घरी जायचो. पण गेल्या काही दिवसात मी दहीसर मेट्रो करून, तिथून रिक्षा करून तिथून घोडबंदर मार्गे येत होतो."
advertisement
( 'अतिशय वाईट, बेकार..' रुपाली भोसले संतापली; VIDEO शेअर करत म्हणाली, 'रात्री शूट करायचं आणि सकाळी...' )
अभिनेते मिलिंद पुढे म्हणाले, "इथल्या रस्त्याची दिवसेंदिवस जी काही अवस्था होऊ लागली, अवस्था हा शब्द मी खूप सिंपल वापरतोय. बिकट, भयंकर, जीवघेणा, अतिशय यातनांनी भरलेला तो प्रवास चालू झाला होता. कारण घोडबंदर रोडवर जेव्हा तुम्ही फाऊंटन हॉटेल सोडता आणि ठाण्याकडे यायला लागता तेव्हा रस्ता उरलेलाच नव्हता, फक्त खड्डे होते. त्यात ट्रक्स आणि सर्व प्रकारची वाहनं त्यांचे चालक स्वत:चा जीव धोक्यात घालून इकडे येत होते. कारण सगळ्यांना जगायचं आहे मुंबई सारख्या शहरात, पैसे कमवायचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पर्यायच नाही."
"गेल्या काही दिवसात एक विनोद माझ्या कानावर आला की, पूर्वी मी व्हाया मिरारोड मार्गे, नंतर पवई मार्गे घाटकोपर मार्गे यायला लागलो ज्यात माझे डबल पैसे जातात. आता तो विनोद असा होता की, आता मला दुबई मार्गे ठाण्याला येणं सोपं पडणार आहे", असंही त्यांनी सांगितलं.
मिलिंद त्यांनी आवाहन करत म्हटलं, "रस्त्याच्या समस्यांशी संबंधित लोक आहेत त्या सगळ्यांना एक विनंती आहे की, प्लिज ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करा. कारण एक बेसिक रस्ता चांगला रस्ता लोकांना ये जा करण्यासाठी मिळणं हा त्यांचा हक्क आहे. हक्क आहे हे विधान मी खूप जबाबदारीने करत आहे. प्रवासासाठी रस्ता उपलब्ध करून देणं हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे बाकी सर्व कामं सोडून."
"कोण मिलिंद फाटक, काय बोलतोय, असं बोलून त्याकडे दुर्लक्ष करणार असाल तर माझं काहीच म्हणणं नाहीये. मला प्रवास करायचाच आहे, मला पैसे कमवायचेच आहेत, मला मुंबई सारख्या शहरात जगायचच आहे. या सर्व यातनांनी भरलेला प्रवास करत मी रोज शूटींगला येणार, त्या यातनांना विसरून लोकांचं मनोरंजन मी करत राहणार, त्यांना हसवत राहणार, रडवत राहणार जरी मी रडत रडत प्रवास करत असलो तरी सुद्धा. सो प्लिज प्लिज प्लिज या रस्त्यांच्या अवस्थेकडे प्लिज लक्ष द्या", असंही ते म्हणाले.