Soyabean Rate: नवीन सोयाबीन बाजारात दाखल, जालन्यात मिळतोय एवढा दर
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Soyabean Rate: जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडाभरापूर्वीच नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे.
जालना: बाजारामध्ये नव्या सोयाबीनची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. पण, सोयाबीनला समाधानकारक दर नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीन येण्यास सुरुवात झाली आहे. या सोयाबीनला प्रतिक्विंटल 2500 ते 3775 रुपये एवढा दर मिळत आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रतिक्विंटल 5328 रुपये हमीभावापेक्षा हा दर फारच कमी आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.
जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडाभरापूर्वीच नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सध्या दररोज 30 ते 40 क्विंटल सोयाबीन बाजारात येत आहे. या सोयाबीनमध्ये 20 ते 25 टक्के आर्द्रता असल्याने प्रतिक्विंटल 2500 ते 3775 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आर्द्रतेचं प्रमाण कमी झाल्यास प्रतिक्विंटल 4000 ते 4300 रुपयांपर्यंत दर मिळतील, अशी माहिती व्यापारी अशोक पाचफुले यांनी लोकल 18शी बोलताना दिली.
advertisement
दरम्यान, आगामी काळात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांकडे मागील वर्षीचा स्टॉक देखील शिल्लक आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता फार कमी आहे. केंद्र सरकारने 5328 रुपये एवढा हमीभाव जाहीर केला असल्याने सध्या आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्रीस घेऊन येताना दिसत आहेत. मोठे शेतकरी जास्त दर मिळण्याच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवू शकतात, अशी शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
advertisement
सोयाबीन व्यापारी पाचफुले म्हणाले, "सोयाबीनचे दर हे 5000 रुपयांपर्यंत पोचल्यास शेतकरी समाधानी राहतील. शेतकरी समाधानी राहिल्यास व्यापाऱ्यांनाही समाधान वाटते. पण, आगामी काळात दराची स्थिती फारशी समाधानकारक राहण्याची चिन्हे नाहीत."
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 15, 2025 2:35 PM IST