1970 च्या दशकामध्ये बॉलिवडूमध्ये अभिनेत्री पार्श्वगायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं आहे. सुलक्षणा या संगीतकार जतिन-ललित आणि अभिनेत्री विजेता पंडित यांच्या भगिनी होत्या. गुरुवारी रात्री ८.०० वाजता नानावटी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती संगीतकार ललित पंडित यांनी दिली. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते आणि सहकलाकारांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
advertisement
सुलक्षणा पंडित यांचा जीवन प्रवास
१९७० च्या दशकात सुलक्षणा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणून आणि पार्श्वगायनात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची विशेष ओळख होती. १९७५ मध्ये संजीव कुमार यांच्यासोबत 'उलझन' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या सुरुवातीस त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आणि स्वतःला एक प्रमुख अभिनेत्री म्हणून स्थापित केलं. 'संकल्प', 'हेरा फेरी', 'अपनापन', 'खानदान', 'चेहरे पे चेहरा', 'धरम काँटा' आणि 'वक्त की दीवार' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. १९७८ मध्ये, त्यांनी बंगाली चित्रपट 'बाँदी' मध्ये अभिनय केला, जिथे त्या उत्तम कुमार यांच्यासोबत दिसल्या.
गायिका म्हणून योगदान
पडद्यावरील उपस्थितीसोबतच सुलक्षणा यांनी गायन क्षेत्रातही मोठे योगदान दिलं. १९६७ मध्ये 'तकदीर' चित्रपटातील 'सात समंदर पार से' या गाण्यात लता मंगेशकर यांच्यासोबत बालकलाकार म्हणून त्यांनी गायन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी किशोर कुमार आणि हेमंत कुमार यांसारख्या नामवंत संगीतकारांसोबत गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी हिंदी, बंगाली, मराठी, उडिया आणि गुजराती यासह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली. १९८० मध्ये 'जज्बात' नावाचा अल्बम त्यांनी प्रदर्शित केला आणि त्या गझल गायिका म्हणूनही ओळखल्या जात.
प्रसिद्ध पार्श्वगायकांसोबतचे त्यांचे युगल गीत (Duets) आणि संगीत दिग्दर्शकांसोबतच्या कामामुळे संगीत उद्योगात त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. १९८६ मध्ये, त्यांनी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये "फेस्टिव्हल ऑफ इंडियन म्युझिक" मैफिलीचा भाग म्हणून सादरीकरण केले होते.
त्यांनी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शैलेंद्र सिंग, येसुदास, महेंद्र कपूर आणि उदित नारायण यांसारख्या संगीत दिग्गजांसोबत काम केलं. त्यांनी गायलेले अखेरचे रेकॉर्ड केलेले योगदान म्हणजे 'खामोशी द म्युझिकल' (१९९६) मधील 'सागर किनारे भी दो दिल' या गाण्यातील एक आलाप. हे गाणे त्यांचे भाऊ जतिन आणि ललित यांनी संगीतबद्ध केले होतं.
