नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी घोषणा केली की व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना माचादो यांची 2025 चा नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना हा सन्मान व्हेनेझुएलातील जनतेच्या लोकशाही हक्कांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततामय संक्रमण घडविण्यासाठी केलेल्या लढ्यासाठी दिला गेला आहे.
advertisement
मारिया माचादो या राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या कट्टर टीकाकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक वर्षांपासून अहिंसात्मक राजकीय बदलासाठी, मुक्त निवडणुकांसाठी आणि मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. व्हेनेझुएलातील गंभीर राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर माचादो या लोकशाहीच्या लढ्याचं प्रतीक बनल्या आहेत.
कोण आहेत मारिया कोरिना माचादो?
मारिया कोरिना माचादो यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 रोजी काराकास (व्हेनेझुएला) येथे झाला. त्या मानसशास्त्रज्ञ कोरिना पॅरिस्का आणि उद्योगपती हेन्रीक माचादो झुलोआगा यांच्या कन्या आहेत. राजकारणातील त्यांची ओळख केवळ नेत्याच्या रूपातच नाही, तर औद्योगिक अभियंता, मानवाधिकार कार्यकर्ती आणि लोकशाही सुधारणा चळवळीच्या समर्थक म्हणूनही आहे.
माचादो यांनी अँद्रेस बेलो कॅथोलिक युनिव्हर्सिटी येथून औद्योगिक अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि नंतर काराकासमधील IESA (Instituto de Estudios Superiores de Administración) मधून वित्त विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाचा उपयोग त्यांनी पुढे राजकारण आणि प्रशासनामधील व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी केला.
त्या 2002 साली व्हेनेझुएलाच्या राजकारणात सक्रियपणे उतरल्या, जेव्हा त्यांनी ‘सुमाते’ (Súmate) नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचं उद्दिष्ट होतं. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका प्रोत्साहित करणे व नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण करणे. काळाच्या ओघात माचादो या व्हेनेझुएलाच्या लोकशाही चळवळीतील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक बनल्या.
2013 साली त्यांनी ‘वेंते व्हेनेझुएला’ (Vente Venezuela) नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. जो वैयक्तिक स्वातंत्र्य, बाजाराधारित विकास आणि लोकशाही उत्तरदायित्वाच्या तत्त्वांवर आधारित आहे. या मूल्यांनीच त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीला दिशा दिली.
नोबेल समितीने त्यांची निवड का केली?
नोबेल समितीने म्हटले आहे की, मारिया माचादो या लॅटिन अमेरिकेतील सर्वात धैर्यशील लोकशाही रक्षकांपैकी एक आहेत. त्यांनी व्हेनेझुएलामधील वाढत्या हुकूमशाहीविरुद्ध एकजूट निर्माण करणारे नेतृत्व केले. त्यांच्या लढ्याचा पाया होता. लोकशाहीचा बचाव गोळ्यांनी नव्हे, तर मतपेट्यांनी व्हायला हवा, हा त्यांचा विश्वास आहे.
छळ, खटले आणि सततच्या जीवघेण्या धमक्यांच्या छायेत असूनही माचादो यांनी न्याय, मानवाधिकार आणि लोकशाहीसाठीचा लढा कधीच सोडला नाही. 2024 मध्ये त्या व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील प्रमुख विरोधी उमेदवार म्हणून उदयास आल्या. मात्र मादुरो सरकारने त्यांची उमेदवारी अवैध ठरवून नाकारली.
तरीही माचादो यांनी माघार घेतली नाही. त्यांनी एडमुंडो गोंझालेझ उरुतिया या दुसऱ्या विरोधी नेत्याला पाठिंबा दिला आणि शेकडो स्वयंसेवकांना संघटित करून देशभरात मतदान प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी निरीक्षक म्हणून उभं केलं.
जेव्हा मादुरो सरकारने विरोधकांच्या विजयाला मान्यता देण्यास नकार दिला, तेव्हा माचादो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभरातील मतदान केंद्रांमधील प्रत्यक्ष मतमोजणीचे पुरावे सार्वजनिक केले. हा एक अत्यंत धाडसी निर्णय होता. या कृतीने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष व्हेनेझुएलाकडे वेधले आणि जगभरातून पाठिंबा मिळाला.
सध्या त्या गुप्त ठिकाणी राहात असूनही, त्यांनी लोकशाहीच्या लढ्याला चालना देणे थांबवलेले नाही. त्यांच्या धैर्य, चिकाटी आणि जनतेवरील विश्वासामुळे त्या व्हेनेझुएलातील लाखो नागरिकांसाठी आशेचे प्रतीक बनल्या आहेत.
मारिया कोरिना माचादो यांच्या या सन्मानाने व्हेनेझुएलामधील लोकशाही चळवळीला नवसंजीवनी मिळाली आहे. नोबेल समितीच्या घोषणेनंतर जगभरातील नेते, कार्यकर्ते आणि मानवाधिकार संस्था त्यांच्या संघर्षाचा आणि धैर्याचा गौरव करत आहेत.
10 डिसेंबर 2025 रोजी ओस्लो येथे होणाऱ्या समारंभात त्यांना हा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला जाईल.