रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे काय?
हे काही जादुई खनिज नाहीत तर 17 धातूंचा समूह आहे. जसं लोखंड किंवा तांबे असतं तसंच हे खनिज आहेत. फरक इतकाच की- ही धातू जमिनीतून बाहेर काढणे आणि शुद्ध करणे अत्यंत कठीण व महागडं काम आहे. बराच काळ या धातूंचा फारसा वापर नव्हता. पण जसे-जसे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांचे युग आलं तसतशी यांची किंमत आकाशाला भिडली.
advertisement
खरी ताकद चुंबकाची
या रेअर अर्थ मिनरल्समधून सुपर मॅग्नेट्स तयार होतात. हे छोटे दिसणारे पण ताकदवान चुंबक आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाची कणा आहेत.
स्मार्टफोनमध्ये
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये
टीव्ही स्क्रीनमध्ये
विमानांच्या इंजिनमध्ये
वीज टर्बाइनमध्ये
विशेष म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या या चुंबकांशिवाय शक्यच नाहीत. इलॉन मस्कची टेस्ला असो किंवा अन्य कोणतीही कंपनी, रेअर अर्थ मॅग्नेट नसेल तर त्यांचा उद्योग ठप्प होतो.
चीन कसा बनला राजा?
30-40 वर्षांपूर्वी चीनने दूरदृष्टी दाखवली. इलेक्ट्रॉनिक्सचा काळ येणार हे ओळखून त्यांनी मोठ्या प्रमाणावर खाणी उघडल्या, रिफाइनिंग प्लांट्स उभारले आणि चुंबक बनवणाऱ्या कारखान्यांची उभारणी केली.
परिणाम असा की आज जगातील 90% रेअर अर्थ रिफाइनिंग चीनमध्ये होते. तसेच 60–70% खाणीही तिथेच आहेत. इतकंच नव्हे तर चीनने म्यानमार, आफ्रिका आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तानपर्यंत खाणींवर कब्जा मिळवला आहे. म्हणजे केवळ स्वतःच्या देशातूनच नव्हे तर इतर देशांतूनही रेअर अर्थ खनिज काढून तो आपल्याच नियंत्रणाखाली ठेवला आहे.
बाकी जग का अडकलं?
अमेरिका सारखे देश आधी स्वतः खनन करत होते. पण चीनने अत्यंत स्वस्त दरात चुंबक विकायला सुरुवात केली. त्यामुळे इतर देशांनी आपल्याकडील खाणी बंद केल्या. 2002 मध्ये अमेरिकेने आपला सर्वात मोठा प्लांटच बंद केला. सर्वांना वाटलं चीनकडून खरेदी करणे सोपे आहे. पण जेव्हा इलेक्ट्रिक गाड्यांचा काळ सुरू झाला तेव्हा चीनने पुरवठा रोखून ठेवला आणि सर्वांवर दबाव आणला.
भारत आणि जगाची स्थिती
आज चीनकडे सुमारे 4.4 कोटी टन रेअर अर्थ खनिजांचा साठा आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे ब्राझील (2.1 कोटी टन) आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत (70 लाख टन). फरक इतकाच की, चीन गेल्या 40 वर्षांपासून या धंद्यात आहे. तर भारत आता सुरुवात करत आहे.
भारताने ‘नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन’ सुरू केले आहे. उद्दिष्ट स्पष्ट आहे स्वतःच्या साठ्याचे खनन करणे, रिफाइन करणे आणि स्वतःचे मॅग्नेट तयार करणे. पण याला वेळ लागणार आहे. तोवर चीनकडूनच खरेदी करणे भाग आहे.
पुढचा काळ कसा असेल?
जसा कधी तेलावर नियंत्रण ठेवणारे अरब देश संपूर्ण जगाला ब्लॅकमेल करत होते. तसाच खेळ आता रेअर अर्थ मिनरल्सवर चीन खेळत आहे. फरक इतकाच की, हा खेळ भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित आहे. इलेक्ट्रिक गाड्या, स्मार्टफोन, टर्बाइन… सगळं काही यावर अवलंबून आहे.
म्हणजे तेलाचा काळ आता संपत चालला आहे. खरी ताकद चुंबकांमध्ये आहे. आणि ही ताकद चीनने आपल्या ताब्यात घेतली आहे. प्रश्न इतकाच आहे की, भारत आणि इतर जग या जाळ्यातून कितपत लवकर बाहेर पडतात. आत्ता मात्र सगळ्यांनी देव पाण्यात ठेवली आहेत. कारण पुढची क्रांती ही चुंबकांची असणार आहे.