ग्रॅच्युईटीचा वाद रक्तरंजित ठरला
याच वादातून लताबाईने आपल्या मित्राच्या मदतीने सुनेचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कल्याण पूर्वेतील जिम्मीबाग, कर्पेवाडी परिसरातील घरात रूपाली असताना लताबाई गांगुर्डे आणि तिचा मित्र जगदीश म्हात्रे यांनी तिच्या डोक्यात लोखंडी सळईने जोरदार वार केला. या हल्ल्यात रूपालीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह वालधुनी रेल्वे पुलाखाली फेकून देण्यात आला.
advertisement
त्यानंतर वालधुनी रेल्वे पुलाखाली एका महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने महात्मा फुले चौक पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. याच वेळी आरोपी सासू लताबाई गांगुर्डे पोलिस ठाण्यात सून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. तिने दिलेला फोटो मृत महिलेच्या चेहऱ्याशी जुळत असल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. विलास गांगुर्डे यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावरील नोकरीवरूनही सासू-सुनेत वाद होता. अखेर पैशांच्या आणि नोकरीच्या वादातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक विजय नाईक यांच्या फिर्यादीवरून लताबाई गांगुर्डे आणि जगदीश म्हात्रे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अवघ्या 24 तासांत दोघांना अटक करण्यात आली आहे.
