दिल्ली येथे झालेल्या बॅाम्ब स्फोटानंतर ठाणे जिल्ह्याला हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरही सेक्युरिटी अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रमुख रेल्वे स्थानकांवर बॅाम्ब शोध पथकाची शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. शिवाय, श्वान पथकाकडून शोध मोहिमेमध्ये मदत केली जात आहे. बॉम्ब शोध पथकासोबतच रेल्वे पोलिसही शोध मोहिमेसाठी मदत करत आहेत. बॉम्ब शोध पथक आणि रेल्वे पोलिस प्रवाशांच्या प्रत्येक सामानाची तपासणी करीत आहे. त्यासोबतच प्रत्येक व्यक्तीचीही चौकशी करत आहे. संशयिताची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
advertisement
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात संध्याकाळी 06:45 वाजेच्या सुमारास एका मारुती सुझुकी इको व्हॅनमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांचा आकडा वाढताना दिसत आहे. घटनेनंतर दिल्लीमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. सोबतच, देशातील प्रमुख ठिकाणांवरही नाकाबंदी करत व्यक्तींची आणि त्यांच्या गाड्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी अवघ्या 2 तासांमध्येच एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. व्हॅनमध्ये हा IED स्फोट होता, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहे.
हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, आजूबाजूचा परिसर स्फोटानं हादरला. घटनास्थळी इको व्हॅनजवळ उभ्या असलेली कार, रिक्षा आणि दुचाकींना आग लागली. या स्फोटामध्ये काही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या स्फोटानंतर गाड्यांना आग लागली. घटनेती माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू केलं आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तपास करत असून, स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सुरक्षा यंत्रणांनी परिसर सील केला आहे आणि सर्व बाजूने तपास सुरू आहे.
