बिबट्या आला रे आला
आंबेशिव हे बदलापूरपासून काही अंतरावर असलेले गाव असून येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या गावाच्या हद्दीत एक नाही तर दोन बिबटे असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यांनुसार शुक्रवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास एका बिबट्याने भरदुपारीच एका कुत्र्याची शिकार केली. या घटनेनंतर गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वीही एका घराच्या आवारात बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. हे फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भिती पसरली आहे
advertisement
आज गावातील एका रस्त्यावर रक्ताचे डाग आढळून आले. यामुळे बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा ग्रामस्थांचा दावा अधिक वाढला आहे. लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेबाबत गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळले जात आहे.
स्थानिकांनी बिबट्याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. या भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले असून बिबट्याला पकडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र अद्याप बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलेले नाही.
