बदलापूरच्या आंबेशिव गावाच्या हद्दीत एक नव्हे तर दोन- दोन बिबटे असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. बिबट्यानं भरदुपारीच कुत्र्याची शिकार केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. बदलापूर नजीक असलेल्या आंबेशिव गावात बिबट्याची प्रचंड दहशत आहे. एका बिबट्यानं आज, शुक्रवारी (12 डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास एका कुत्र्याची शिकार केल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला. तर इथे एक नव्हे दोन बिबटे असल्याचंही गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून आंबेशिव गावात स्थानिकांना बिबट्या दिसल्यामुळे इथले ग्रामस्थ दहशतीत जगत आहेत.
advertisement
गावकऱ्यांनी बिबट्या असल्याचा दावा केल्यानंतर याबाबतची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाकडून या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा राबवण्यात आले. शिवाय, तातडीने पावले उचलून उपाययोजनाही सुरू केल्या होत्या. मात्र बिबट्याला पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आलेले नाही. बिबट्याने एका वस्तीजवळ कोंबड्यांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. त्यानंतर आज रस्त्यावर रक्ताचा सडा दिसून आला. बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे आंबेशिव तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
