दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवाशांसाठी असलेल्या अपुऱ्या सुविधा लक्षात घेता रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मुख्य शहरांतील रेल्वे स्टेशन्सवर कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. सर्वाधिक रहदारी असलेल्या स्थानकांवर वाहतुक सुरळित करण्यासाठी पाऊल उचलले जात आहेत. पुढच्या पाच वर्षांमध्ये घोषित करण्यात आलेल्या 548 लोकल्स टप्प्याटप्प्याने सुरू केले जाणार आहेत. येणाऱ्या वर्षांत गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल.
advertisement
2030 पर्यंत गाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट करण्यासाठी काम केले जाणार आहे. सध्याच्या रेल्वे टर्मिनल्समध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स आणि पुरेशा शंटिंग सुविधांचा समावेश करणे, शहरी भागात आणि आसपास नवीन टर्मिनल्स ओळखणे/ निश्चित करणे आणि तयार करणे, मेगा कोचिंग कॉम्प्लेक्ससह देखभाल सुविधा, विविध ठिकाणी वाढलेल्या गाड्यांना हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुविधेच्या कामांसह विभागीय क्षमता वाढवणे, सिग्नलिंग अपग्रेडेशन/ अद्ययावतीकरण आणि मल्टीट्रॅकिंग ही कामे केली जाणार आहेत.
मध्य रेल्वेवर परळ ते कुर्ला स्थानकादरम्यान 5व्या आणि 6 व्या मार्गिका, हार्बर मार्गावर कुर्ला डेकजवळ 5वी आणि 6वी मार्गिका सोबतच कल्याण- कसारा मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका सुद्धा अपग्रेड केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेबद्दल जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी सांगितले की, उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वेची वहन क्षमता वाढवणे, लोकलची गर्दी कमी करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गाच्या विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवर 20 नवीन रेल्वे सेवा सुरू केल्या जाणार आहेत. तर नवीन एसी लोकल सुद्धा सुरू केल्या जाणार आहेत. भविष्यात अधिक एसी लोकल गाड्याही प्रवाशांच्या सेवेत आणल्या जाणार आहेत. सध्या, पश्चिम रेल्वेवर 116 रॅकद्वारे दररोज 1,406 उपनगरीय सेवा चालवते.
