सासू झाली वैरीण
वालधुनी पुलाखाली रस्त्याच्या कडेला काही दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, डोळ्याजवळ आणि मनगटावर गंभीर जखमा होत्या. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते.
दरम्यान 1 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता सासू लताबाई गांगुर्डे यांनी आपली सून बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी मृत महिलेचा फोटो दाखवताच तिने तीच आपली सून असल्याचे सांगत रडारड सुरु केली. मात्र या सासूच्या अशा वागण्यामुळे पोलिसांचा संशय तिच्यावर गेला.
advertisement
रूपालीचे पती विलास गांगुर्डे हे भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यांचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर रूपालीला सुमारे 9 ते 10 लाख रुपये मिळाले होते. या पैशांवरून सासू-सुनेत वारंवार वादही होत असल्याची माहिती तपासात समोर आली होती.
रक्ताच्या एका थेंबाने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा
पोलिसांनी रुपालीच्या सासूवर संशय आल्याने त्यांनी तातडीने तिच्या घरी जाऊन घर तपासले. या तपासादरम्यान पोलिसांना आणि फॉरेन्सिक पथकाला लताबाईच्या घरातल्या फरशीवर रक्ताचे थेंब आढळले. हे रक्त रूपालीचे असल्याचे समोर आले. चौकशीत लताबाईने गुन्ह्याची कबुली दिली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी कपडे धुतले आणि मृतदेह दुचाकीवरून वालधुनी पुलाखाली फेकून दिल्याचे उघड झाले.
