नेमक कारण काय?
मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा बुधवारी सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. बदलापूर आणि वांगणी दरम्यान डाऊन मार्गावर अग्निरोधक यंत्रणा अचानक सक्रिय झाल्याने मेल आणि एक्स्प्रेस गाड्या आपोआप थांबल्या आणि त्याचा थेट परिणाम लोकल सेवांवर झाला. बदलापूरहून कर्जत दिशेला जाणाऱ्या लोकल तब्बल चार तास रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले. पण मिळालेल्या माहितीनुसार अग्निरोधक यंत्रणा अचानक सक्रिय याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वे रुळाच्या बाजूला लावलेल्या शेकोटी किंवा रेल्वे रुळा लगत लावलेल्या आगीमुळे ही समस्या निर्माण झाली होती.
advertisement
या घटनेमुळे कर्जतहून मुंबईकडे तसेच मुंबईहून कर्जत दिशेला जाणारी लोकल वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अपमार्गावरील गाड्यांवरही या बिघाडाचा परिणाम झाला. गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ-बदलापूर-वांगणी परिसरात वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.
मंगळवारीही तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे पुन्हा हाल
मंगळवारीही याच भागात सकाळी साडेसहाच्या सुमारास अग्निरोधक प्रणाली सक्रिय झाल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्या जवळपास तासभर थांबून राहिल्या होत्या. हा दोष दूर करण्यासाठी रेल्वेला मोठी कसरत करावी लागली.पण त्यानंतर अवघ्या एका दिवसातच बुधवारी पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवासी संतापले.
कल्याण-कर्जत मार्गावर दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत झाल्याने अनेकांना कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. पुणे आणि दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्याही उशिराने सुटत असल्याची माहिती समोर आली आहे.
